उदय सामंतांचा महत्त्वपूर्ण निर्णय:बांदा शहराला उच्चदाब विद्युत वाहिनीच्या धोक्यातून दिलासा..
⚡बांदा ता.०५-: आडाळी एमआयडीसीसाठी नेण्यात येणारी 33 केव्ही क्षमतेची विद्युत वाहिनी बांदा शहरातून भूमिगत पद्धतीने नेण्यात यावी, या मागणीला यश आले आहे. उद्योगमंत्री उदय सामंत यांनी ओरोस येथे झालेल्या बैठकीत बांदा पोलीस चेक पोस्ट ते पानवळदरम्यानची 3 किलोमीटर विद्युत वाहिनी भूमिगत करण्याचे निर्देश संबंधित अधिकाऱ्यांना दिले आहेत.
बांदा शहरातील नागरिकांची सुरक्षितता, वाढती वाहतूक आणि भविष्यातील नागरी विकास लक्षात घेता ही उच्चदाब विद्युत वाहिनी भूमिगत करणे आवश्यक असल्याची मागणी ग्रामपंचायत सदस्य साईप्रसाद काणेकर यांनी केली होती. यासंदर्भात पंचायत समिती सदस्या ऋतिका संदेश नाईक आणि ओंकार नाडकर्णी यांच्या शिष्टमंडळाने उद्योगमंत्री उदय सामंत यांची भेट घेऊन निवेदन सादर केले.
बांदा हे सावंतवाडी तालुक्यातील महत्त्वाचे व्यापारी केंद्र असून मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गालगत वसलेले शहर आहे. शहरातून जाणाऱ्या उच्चदाब विद्युत वाहिनीमुळे नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता लक्षात घेऊन ती भूमिगत करण्याची मागणी करण्यात आली होती.
या मागणीसाठी शिवसेना शिंदे गटाचे जिल्हाप्रमुख संजू परब यांनी विशेष पुढाकार घेत पाठपुरावा केला. त्यांच्या सहकार्यामुळे या विषयाला गती मिळाल्याचे साईप्रसाद काणेकर यांनी सांगितले.
ओरोस येथे एमआयडीसी संदर्भात झालेल्या बैठकीत उद्योगमंत्री उदय सामंत यांनी संबंधित यंत्रणेला 3 किलोमीटरची 33 केव्ही विद्युत वाहिनी तातडीने भूमिगत करण्याचे निर्देश दिले. या निर्णयामुळे बांदा शहरातील नागरिकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने महत्त्वाचा प्रश्न मार्गी लागण्याची शक्यता असून, नागरिकांमधून समाधान व्यक्त केले जात आहे.
फोटो:-
सावंतवाडी येथे उद्योगमंत्री उदय सामंत यांच्याशी चर्चा करताना साईप्रसाद काणेकर, ऋतिका नाईक व ओंकार नाडकर्णी.

