पिंगुळी पाझर तलावाच्या प्रश्नावर आमदार निलेश राणे यांची ठाम भूमिका:ग्रामपंचायतीत ग्रामस्थांशी साधला संवाद..

⚡कुडाळ ता.०५-: पिंगुळी पाझर तलावाच्या संरक्षणासाठी ग्रामस्थांनी सुरू केलेल्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर राजकीय आरोप-प्रत्यारोपांना वेग आला असतानाच आमदार निलेश राणे यांनी पिंगुळी ग्रामस्थांशी संवाद साधत या प्रश्नावर आपली भूमिका स्पष्ट केली. ‘ग्रामस्थांच्या मागण्यांवर तोडगा निघेपर्यंत संबंधित डेव्हलपरला एकही काम करू देणार नाही,’ असा स्पष्ट शब्दांत इशारा देत त्यांनी गावाच्या पिण्याच्या पाण्याच्या स्रोताचे संरक्षण करण्याची ग्वाही दिली. ‘गावाच्या प्रश्नावर मी सर्वांत पुढे उभा राहीन,’ असा विश्वासही त्यांनी ग्रामस्थांना दिला.
आमदार राणे म्हणाले, पाझर तलावाला हात लावला जाऊ नये, तलावाकडे जाणारी पायवाट बंद केली जाऊ नये आणि तलावातील पाणी प्रदूषित होऊ नये, या ग्रामस्थांच्या मागण्या योग्य आहेत. ग्रामस्थांची कोणतीही गैरसोय होऊ नये, यासाठी जिल्हाधिकारी आणि तहसीलदार यांच्याशी चर्चा केली आहे. ग्रामस्थांच्या सर्व मागण्या मार्गी लागेपर्यंत संबंधित डेव्हलपरचे काम थांबविण्याबाबत स्पष्ट सूचना देण्यात याव्यात. गावाच्या हिताच्या विरोधात कोणालाही मनमानी करू देणार नाही, असे त्यांनी स्पष्ट केले.
जिल्हा परिषद सदस्य गंगाराम सडवेलकर यांनी यापूर्वी विविध निवेदने घेऊन आपली भेट घेतली होती. त्यांना दोन वेळा बैठकीसाठी बोलावूनही ते उपस्थित राहिले नाहीत. आंदोलनाची वेळ येण्यापूर्वीच चर्चा करून हा प्रश्न सोडविता आला असता. मात्र, आता या विषयाचे राजकीय भांडवल केले जात असल्याचा आरोप राणे यांनी केला. काही माजी लोकप्रतिनिधी ग्रामस्थांच्या प्रश्नांपेक्षा राजकीय श्रेयाला अधिक महत्त्व देत असल्याची टीकाही त्यांनी केली.
ग्रामस्थांना डेव्हलपरकडून कोणतीही दमदाटी किंवा अन्याय सहन करावा लागणार नाही. गावाचा प्रश्न सुटेपर्यंत एकही काम पुढे जाऊ देणार नाही. ग्रामस्थांच्या हरकती आणि मागण्या संबंधित डेव्हलपरसमोर मांडून त्यावर समाधानकारक तोडगा काढण्याचा प्रयत्न केला जाईल, असेही त्यांनी सांगितले.
यावेळी गावातील एकजुटीचे महत्त्व अधोरेखित करताना वैयक्तिक मतभेद बाजूला ठेवून गावाच्या हितासाठी सर्वांनी एकत्र राहण्याचे आवाहन त्यांनी केले. गावामध्ये फूट पाडण्याचा प्रयत्न करणाऱ्यांना ओळखा. पिंगुळीच्या विकासासाठी ग्रामस्थांनी एकसंघ राहणे आवश्यक आहे, असे ते म्हणाले.
यावेळी त्यांनी गावातील विकासकामांचाही आढावा घेतला. अजय आकेरकर यांनी मांडलेल्या बोंदाऱ्याच्या प्रश्नासह अन्य विकासकामांचे प्रस्ताव मार्गी लावण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी सांगितले. डिसेंबरनंतर विविध विकासकामांच्या भूमिपूजनासाठी पुन्हा पिंगुळीत येण्याचा मानसही त्यांनी व्यक्त केला.
सरपंच अजय आकेरकर यांनी गावातील रस्त्यांच्या समस्या, कायमस्वरूपी पाणीपुरवठा योजना आणि नवीन ग्रामपंचायत इमारतीच्या प्रश्नाकडे आमदारांचे लक्ष वेधले. वाढती लोकसंख्या लक्षात घेता गावासाठी कायमस्वरूपी पाणीपुरवठा योजना आवश्यक असून, त्यासंदर्भात प्रस्ताव आणि अंदाजपत्रक तयार करण्यात आले आहे. या योजनेसाठी आमदारांनी पाठपुरावा करावा, तसेच नवीन ग्रामपंचायत इमारतीसाठी आर्थिक मदत मिळवून द्यावी, अशी मागणी त्यांनी केली.
ग्रामस्थांच्या वतीने व्यंकू पांगुळ यांनी पाझर तलावालगत प्रस्तावित असलेला प्रकल्प रद्द करण्यात यावा, अशी ठाम मागणी केली.
यावेळी व्यासपीठावर सरपंच अजय आकेरकर, शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत, सभापती मिलिंद नाईक, कुडाळचे तहसीलदार सचिन पाटील, संजय आंग्रे, आनंद शिरोडकर, संजीव परब आदी उपस्थित होते.
