Headlines

अतिरिक्त ठरलेल्या पदवीधर शिक्षकांना पुन्हा पदोन्नतीची संधी

१३ जागा भरण्याचा निर्णय:शिक्षण समितीच्या सभेत माहिती..

सिंधुदुर्गनगरी ता ५
सिंधुदुर्ग जिल्ह्यात उपशिक्षकांच्या रिक्त असलेल्या जागा मोठ्या संख्येने भरण्यात आल्या आहेत. मात्र अद्यापही पदवीधर शिक्षकांच्या १३ जागा रिक्त आहेत. यापूर्वी अतिरिक्त ठरलेल्या आणि उपशिक्षक म्हणून नियुक्ती दिलेल्या पदवीधर शिक्षकांना पुन्हा ज्येष्ठतेनुसार पदवीधर शिक्षक म्हणून नियुक्त्या द्याव्यात. असा ठराव आजच्या शिक्षण समिती सभेत घेण्यात आला.

जिल्हा परिषद शिक्षण समितीची सभा सभापती प्रितेश राऊळ यांच्या अध्यक्षतेखाली आज येथील छत्रपती शिवाजी महाराज सभागृहात संपन्न झाली. यावेळी समिती सचिव तथा प्रभारी शिक्षणाधिकारी सविता परब, समिती सदस्य विक्रांत सावंत, प्रमोद रावराणे, नितीन राऊळ, प्रज्ञा साळगावकर, प्राची ईस्वलकर, गुरुनाथ पेडणेकर आदींसह खाते प्रमुख, अधिकारी उपस्थित होते.

सिंधुदुर्ग जिल्ह्यात पदवीधर शिक्षक अतिरिक्त ठरले होते, त्यावेळी अशा शिक्षकांना रिक्त असलेल्या उपशिक्षक पदावर नियुक्ती देण्यात आल्या होत्या. मात्र नव्याने झालेल्या शिक्षक भरतीत जिल्ह्यातील रिक्त असलेली उपशिक्षक पदे मोठ्या प्रमाणात भरण्यात आली आहेत .सद्यस्थितीत जिल्ह्यात १३ पदवीधर शिक्षकांची पदे नव्याने रिक्त झाली आहेत. ही पदे भरण्यासाठी ज्या अतिरिक्त ठरलेल्या पदवीधर शिक्षकांना यापूर्वी उपशिक्षक पदावर नियुक्ती दिल्या आहेत त्यातून ज्येष्ठतेनुसार पुन्हा पदवीधर शिक्षक पदावर नियुक्त्या द्याव्यात. असा ठराव आजच्या शिक्षण समिती सभेत घेण्यात आला.

एम के सी एल या संस्थेमार्फत ६ वी ते १० वी च्या विद्यार्थ्यांसाठी “साईराम” या नावाने मोफत एआय प्रशिक्षण दिले जाणार आहे. त्यासाठी सिंधुदुर्ग जिल्ह्यात आतापर्यंत दहा हजार मुलांची नोंद झाली आहे.अशी माहिती सभेत देण्यात आली .

You cannot copy content of this page