Headlines

सावंतवाडी पर्यटन महोत्सव डिसेंबर अखेर किंवा जानेवारीच्या दुसऱ्या आठवड्यात होणार…

उपनगराध्यक्ष ॲड. अनिल निरवडेकर यांची घोषणा: तीन दिवस असणार महोत्सव…

⚡सावंतवाडी ता.०६-: स्थानिक पातळीवरील टॅलेंटला आणि कलाकारांना योग्य व्यासपीठ मिळवून देण्यासाठी बंद पडलेला सावंतवाडी नगर परिषदेचा पर्यटन महोत्सव पुन्हा एकदा नव्या जोमाने सुरू करण्यात येणार आहे. येत्या डिसेंबर अखेर अथवा नव्या वर्षात जानेवारीच्या दुसऱ्या आठवड्यात हा महोत्सव तीन दिवसांसाठी आयोजित केला जाईल आणि यातील एक दिवस पूर्णपणे सांस्कृतिक वसा जपणाऱ्या स्थानिक कलाकारांसाठी राखीव असेल, अशी महत्त्वाची घोषणा सावंतवाडी नगर परिषदेचे उपनगराध्यक्ष ॲड. अनिल निरवडेकर यांनी केली.

सम्राट क्लब सावंतवाडी टाऊनच्या वतीने ‘मराठी रंगभूमी दिना’चे औचित्य साधून शहरातील वटसावित्री कला क्रीडा मंडळाच्या व्यासपीठावर आयोजित नाट्यकर्मींच्या सत्कार समारंभात ते बोलत होते. यावेळी बोलताना ॲड. निरवडेकर यांनी सम्राट क्लबने सुरू केलेला सांस्कृतिक वसा आणि कला जोपासण्याचे काम अविरत सुरू ठेवावे, असे आवाहन करत त्यांच्या या सामाजिक व सांस्कृतिक कार्याचे भरभरून कौतुक केले.

या कार्यक्रमात ज्येष्ठ नाट्यकर्मी आणि दिग्दर्शक शंभू पावसकर, जनार्दन पोकळे, गेली ८० वर्षे वटसावित्री कला क्रीडा मंडळ हे विविध सांस्कृतिक क्षेत्रासह नाट्य क्षेत्रात सातत्याने कार्यरत आहे. माजी उपनगराध्यक्ष उमाकांत वारंग यांनी या माध्यमातून नाट्य क्षेत्राला ऊर्जित अवस्था आणण्याचे मोलाचे काम केले, याशिवाय १९५३ पासून दीर्घकाळ नाट्य क्षेत्रात योगदान देणारे शंभू पावसकर आणि जनार्दन पोकळे यांच्या योगदानाचाही गौरव करण्यात आला.उमाकांत वारंग आणि कल्पना बांदेकर यांचा उपनगराध्यक्ष ॲड. अनिल निरवडेकर यांच्या हस्ते शाल, श्रीफळ व सन्मानचिन्ह देऊन गौरव करण्यात आला. त्याबद्दल त्यांचा विशेष सन्मान करण्यात आला.
कार्यक्रमाला नगरसेविका स्नेहा नाईक, सामाजिक कार्यकर्त्या संजना परब, सम्राट क्लबचे अध्यक्ष नरेंद्र देशपांडे, सचिव प्रतिभा चव्हाण, भावी अध्यक्ष हरिश्चंद्र पवार, मालवणी कवी दादा मडकईकर, कौस्तुभ पेडणेकर, डॉ. सोनल लेले, स्मिता केंकरे आणि ॲड. सिद्धी परब आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी नगरसेविका स्नेहा नाईक यांनीही सम्राट क्लबच्या कार्याला शुभेच्छा दिल्या.कार्यक्रमाचे प्रास्ताविक आणि उत्कृष्ट सूत्रसंचालन गुरुप्रसाद चिटणीस यांनी केले, तर उपस्थितांचे आभार कौस्तुभ पेडणेकर यांनी मानले.

You cannot copy content of this page