मालवण (प्रतिनिधी)

आनंदव्हाळ कर्लाचाव्हाळ ग्रामपंचायतीच्या रिक्त असलेल्या उपसरपंच पदाच्या निवडणुकीत मोठी चुरस पाहायला मिळाली. दोन्ही उमेदवारांना समसमान मते पडल्याने सरपंचांच्या निर्णायक मतदानाच्या जोरावर अक्षय कदम यांची उपसरपंच म्हणून निवड झाली आहे.
आनंदव्हाळ कर्लाचाव्हाळ ग्रामपंचायतीच्या उपसरपंच पदाच्या निवडणुकीत अक्षय कदम व अनिल सुकाळी या दोघांनी आपले उमेदवारी अर्ज दाखल केले होते. झालेल्या मतदानात दोन्ही उमेदवारांना प्रत्येकी २ अशी समान मते मिळाली. त्यामुळे निर्माण झालेल्या पेचप्रंगात सरपंचांनी आपल्या अधिकारातील ‘निर्णायक मत’ अक्षय कदम यांच्या बाजूने दिले. परिणामी अक्षय कदम विजयी ठरले. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून ग्रामपंचायत अधिकारी आत्माराम जोशी यांनी कामकाज पाहिले.
या निवडणूकप्रसंगी सरपंच रश्मी टेंबुलकर, ग्रामपंचायत सदस्या सीमा गोवेकर, अनिल सुकाळी, श्रुती सुकाळी, माजी सरपंच रवींद्र टेंबुलकर, अशोक चव्हाण, तंटामुक्त समिती अध्यक्ष चंद्रकांत घाटगे, शिवसेना शाखाप्रमुख गुरू सुकाळी, रजत सुकाळी, ग्रामपंचायत कर्मचारी प्रिशा बांदल, विजय चव्हाण, अभय सुकाळी, प्रसाद गोवेकर आदी उपस्थित होते. निवडणूक प्रक्रिया पार पडल्यानंतर माजी सरपंच अशोक चव्हाण यांच्या हस्ते नूतन उपसरपंच अक्षय कदम यांचा पुष्पहार घालून विशेष सत्कार करण्यात आला व पुढील वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या.
