मालवण (प्रतिनिधी)

दांडी येथील समुद्राच्या पाण्याय जखमी अवस्थेत सापडलेल्या ‘विल्सन स्टॉर्म पेट्रेल’ या दुर्मिळ समुद्री पक्ष्याला पारंपारिक मच्छिमार बाबू आडकर व नाना रोगे यांनी सुखरूप बचाव करत युथ बिट्स फॉर क्लायमेट या संस्थेच्या मार्फत या पक्ष्याला कांदळवन विभागाकडे सुपूर्द करण्यात आले.
दांडी येथील समुद्रात येथील पारंपरिक मच्छिमार हे मच्छिमारीहुन परत येत असताना बाबू उर्फ श्रीराम आडकर यांना दुर्मिळ ‘विल्सन स्टॉर्म पेट्रेल’ हा समुद्री पक्षी समुद्राच्या पाण्यात दुखापत ग्रस्त होऊन पडल्याचे निदर्शनास आले. नाना रोगे यांनी या पक्षास लगेच रेस्क्यू केले व श्रीकृष्ण उर्फ आबा आडकर यांच्या स्वाधीन केले. यावेळी नारायण आडकर व भूषण आडकर उपस्थित होते. हा पक्षी मिळाल्याची माहिती आडकर यांनी युथ बिट्स फॉर क्लायमेट संस्थेला दिली. संस्थेमार्फत लगेच भार्गव खराडे व इकोमेट्स चे निखिल नेरकर यांनी त्याठिकाणी पोहचून पक्ष्याची पाहणी केली वं याची माहिती कांदळवन विभागास दिली. कांदळवन विभागाचे सिंधुदुर्ग वनक्षेत्रपाल महादेव शिंगाडे यांच्या मार्गदर्शनाखाली श्री. खराडे व श्री. नेरकर यांनी तो पक्षी मानस आडकर यांच्याकडून घेऊन कांदळवन विभागाच्या कार्यालयामध्ये सुखरुप सुपूर्द केला.
विल्सन स्टॉर्म पेट्रेल म्हणजेच समुद्री वादळपक्षी (Wilson’s Storm-Petrel) हा छोटा समुद्रपक्षी आहे.त्याचा चा आकार साधारण १७ ते १९ से.मी. लांब असतो तर पंखांचा पसारा सुमारे ३८ ते ४१ से.मी. असतो. अंग गडद तपकिरी-काळसर असून शेपटीजवळ पांढरा ठळक डाग असतो. याची चोच लहान, काळी आणि टोकदार असते. चोचीच्या वरच्या बाजूला नाकपुड्यांना झाकणारी नळीदार रचना (naricorn) असते, ही “tubenose” समुद्रपक्ष्यांची खासियत आहे. चोचीने हा पक्षी पाण्याच्या पृष्ठभागावरचे क्रिल, छोटे मासे आणि इतर सूक्ष्म जीव टिपतो. ते पक्षी अंटार्क्टिका आणि आसपासच्या बेटांवर घरटी करतो. प्रजननानंतर अटलांटिक, हिंदी आणि पॅसिफिक महासागरांतून विषुववृत्त ओलांडून उत्तरेकडे स्थलांतर करतो. यांचे खाणे क्रिलसारखे छोटे कवचधारी जीव, लहान मासे, स्क्विड आणि समुद्राच्या पृष्ठभागावरील अन्य लहान जीव खातो. ते पक्षी पाण्याच्या अगदी जवळ उडत, पायांनी पृष्ठभागाला हलकेच स्पर्श करत अन्न टिपतो, म्हणून तो पाण्यावर चालत असल्यासारखा दिसतो. कधी जहाजांमागेही अन्नासाठी येतो. खडकांच्या भेगांत किंवा बिळांत घरटे करून साधारण एक अंडे घालतो; नर आणि मादी दोघेही अंडे उबवतात, अशी माहिती युथ बिट्स फॉर क्लायमेट संस्थेने दिली.
