Headlines

बंदर जेटीवरील प्रसाधनगृहाच्या दुरुस्तीला सुरुवात…

श्रेयवादावरून ठाकरे गटावर पुनम चव्हाणांचा निशाणा..

मालवण (प्रतिनिधी)

शहरातील नागरिक व पर्यटकांना आवश्यक मूलभूत सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी महायुतीचे लोकप्रतिनिधी कटिबद्ध आहेत. बंदर जेटीवरील सार्वजनिक प्रसाधनगृहातील असुविधा दूर करण्यासाठी मालवण नगरपरिषदेने महिनाभरापासून सुरू केलेल्या कार्यवाहीनंतर आता प्रत्यक्ष दुरुस्तीच्या कामाला सुरुवात झाली आहे. मात्र, या विकासकामाचे श्रेय लाटण्यासाठी ठाकरे गटाकडून केवळ राजकीय स्टंटबाजी सुरू असल्याचा गंभीर आरोप नगरपरिषदेच्या स्वच्छता व आरोग्य सभापती पुनम चव्हाण यांनी केला आहे. दहा वर्षे सत्तेत असताना नागरिकांच्या मूलभूत सुविधांकडे दुर्लक्ष करणाऱ्यांनी आता महायुतीच्या विकासकामांवर श्रेयवादाची लाट उठवू नये, अशा शब्दांत त्यांनी विरोधकांवर निशाणा साधला.

मालवण बंदर जेटी परिसरातील सार्वजनिक शौचालयातील अपुरी विद्युत व्यवस्था, पाण्याची कमतरता आणि तुटलेला स्लॅब यांसारख्या समस्या स्थानिक व्यावसायिकांनी निदर्शनास आणून दिल्या होत्या. याची तात्काळ दखल घेत सभापती पुनम चव्हाण यांनी आरोग्य विभागाच्या कर्मचाऱ्यांसह घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली होती.

आगामी पर्यटन हंगाम लक्षात घेऊन २२ ऑक्टोबर २०२६ रोजी नगराध्यक्षा ममता वराडकर यांच्या उपस्थितीत झालेल्या स्थायी समितीच्या बैठकीत हा विषय प्राधान्याने मांडण्यात आला. नगराध्यक्षांनी संबंधित विभागांना तातडीने कामाचे निर्देश दिले. याशिवाय, प्रसाधनगृहाला कायमस्वरूपी पाण्याचा पुरवठा व्हावा यासाठी लवकरच बोअरवेल उभारली जाणार असल्याचे चव्हाण यांनी स्पष्ट केले.

मालवण हे पर्यटनदृष्ट्या महत्त्वाचे शहर असताना मागील दहा वर्षे सत्तेत असलेल्या ठाकरे गटाने बंदर जेटीच्या सुविधांकडे साफ दुर्लक्ष केले, असा आरोप सभापतींनी केला. “ज्या समस्या दशकात सोडविता आल्या नाहीत, त्या अवघ्या नऊ महिन्यांत सुटल्या पाहिजेत अशी अपेक्षा व्यक्त करणे हास्यास्पद आहे. स्वतःच्या सत्ताकाळातील अपयश झाकण्यासाठी प्रशासनाची बदनामी करणे हाच विरोधकांचा एककलमी कार्यक्रम बनला आहे,” असा घणाघात त्यांनी केला.

आमदार निलेश राणे यांच्या सक्षम नेतृत्वाखाली शहराच्या विकासासाठी मोठ्या प्रमाणावर निधी उपलब्ध होत आहे. प्रत्यक्ष कामाचे स्वागत करण्याऐवजी एआय व्हिडिओ तयार करून शहराची नकारात्मक प्रतिमा निर्माण केली जात असून, यामुळे पर्यटन व्यवसायाला बाधा पोहोचत असल्याचा इशारा त्यांनी दिला. आमदार निलेश राणे व नगराध्यक्षा ममता वराडकर यांच्या मार्गदर्शनाखाली बंदर जेटीसह संपूर्ण किनारपट्टी भागात अद्ययावत सोयीसुविधांनी युक्त सार्वजनिक शौचालये उभारण्यात येणार आहेत.

आमचे प्राधान्य प्रसिद्धी मिळविणे नसून नागरिकांच्या समस्या सोडवणे हेच आहे. विरोधकांनी कितीही स्टंटबाजी केली तरी मालवण शहराच्या विकासाचा वेग थांबणार नाही, असा ठाम विश्वास स्वच्छता व आरोग्य सभापती पुनम चव्हाण यांनी व्यक्त केला आहे.

You cannot copy content of this page