कट्ट्याच्या निसर्ग नगरी संकुलातील चोरीचा छडा;सोन्याचे दागिने आणि रोख रक्कम लंपास केल्याची कबुली..

⚡कुडाळ ता.०५-: मालवण-कट्टा येथील निसर्ग नगरी संकुलातील आठ बंगल्यांचे दरवाजे उचकटून सोन्याचे दागिने आणि रोख रक्कम चोरणाऱ्या संशयितांचा स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने छडा लावला आहे. या प्रकरणी संशयित सुशील यशवंत आळावे (वय २२, रा. देवली गवाणवाडी, मालवण) आणि संतोष मधुसूदन पांगे (वय ४८, रा. धुरीवाडा, मालवण) या दोघांना गुरुवारी (५ नोव्हेंबर) ताब्यात घेण्यात आले.
चौकशीदरम्यान त्यांनी सदर गुन्हा केल्याची कबुली दिल्याची माहिती पोलिसांनी दिली.
मालवण-कट्टा येथील निसर्ग नगरी संकुलात २५ ऑक्टोबर रोजी रात्री ११ ते २६ ऑक्टोबर रोजी पहाटे ३ वाजण्याच्या दरम्यान ही घरफोडीची घटना घडली होती. चोरट्यांनी संकुलातील एकूण आठ बंगल्यांच्या दरवाजांचे कडी-कोयंडे उचकटून आत प्रवेश केला. त्यानंतर घरातील सोन्याचे दागिने आणि रोख रक्कम असा मुद्देमाल चोरून नेला होता. याप्रकरणी २६ ऑक्टोबर रोजी मालवण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
या गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलीस अधीक्षक मोहन दहिकर आणि अपर पोलीस अधीक्षक नयोमी साटम यांच्या आदेशानुसार स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने समांतर तपास सुरू केला. पोलीस निरीक्षक प्रवीण कोल्हे यांच्या नेतृत्वाखाली विविध पथके तयार करण्यात आली होती. घटनास्थळावरून मिळालेली माहिती, मानवी कौशल्य आणि तांत्रिक तपासाच्या आधारे पोलिसांनी संशयितांचा माग काढला.
अखेर गुरुवारी दोन्ही संशयितांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडे चौकशी करण्यात आली. या चौकशीत त्यांनी घरफोडी केल्याची कबुली दिल्याचे पोलिसांनी सांगितले. वैद्यकीय तपासणीनंतर दोघांनाही पुढील तपासासाठी मालवण पोलीस ठाण्यात हजर करण्यात आले आहे.
ही कारवाई पोलीस निरीक्षक प्रवीण कोल्हे यांच्या नेतृत्वाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक सुनील पाटील, पोलीस उपनिरीक्षक अनिल हाडळ, हनुमंत भोसले, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक सुरेश राठोड, पोलीस हवालदार विल्सन डिसोझा, आशिष जामदार, जॅकसन घोन्साल्वीस, किरण देसाई, राजेंद्र गोसावी, पोलीस अंमलदार अमर कांडर आणि सायबर विभागाच्या धनश्री परब यांनी केली.
