Headlines

प्रतीक बांदेकर दोषी की निर्दोष, हे उच्चस्तरीय चौकशीतूनच स्पष्ट होईल..

राजीनाम्यानंतर कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करा; अन्यथा सावंतवाडीकरांची दिशाभूल केल्यासारखे होईल ;अॅड. नीता सावंत-कविटकर..

⚡सावंतवाडी ता.०६-:
पाणीपुरवठा सभापती प्रतीक बांदेकर यांच्या राजीनाम्याबाबत नगरपरिषदेच्या विषय क्रमांक ६ अन्वये संबंधित राजीनामा नगरपरिषद सभेसमोर ठेवून नवीन नियुक्तीबाबत जिल्हाधिकाऱ्यांकडे प्रस्ताव सादर करण्यास मान्यता मिळविण्याचा विषय मांडण्यात आला आहे. त्यामुळे आता या विषयाच्या अनुषंगाने पुढील कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करणे आवश्यक आहे. राजीनामा स्वीकारल्यानंतर नियमानुसार पुढील प्रक्रिया राबविणे गरजेचे असताना भ्रष्टाचार झाला नाही किंवा प्रतीक बांदेकर दोषी नाहीत, असा दावा करण्याचा कोणालाही अधिकार नाही, अशी टीका शिवसेना शिंदे गटाच्या महिला जिल्हाप्रमुख तथा नगरसेविका अॅड. नीता सावंत-कविटकर यांनी केली.

प्रतीक बांदेकर दोषी आहेत की निर्दोष, हे उच्चस्तरीय चौकशीतून आणि वरिष्ठ पातळीवरून स्पष्ट होईल. त्यामुळे या प्रकरणाला राजकीय वळण न देता जिल्हाधिकाऱ्यांमार्फत संपूर्ण प्रकरणाची निष्पक्ष चौकशी झाली पाहिजे. अन्यथा प्रशासन आणि सत्ताधारी सावंतवाडीकरांच्या मूळ प्रश्नाला बगल देऊन त्यांची दिशाभूल करीत असल्याचा अर्थ निघेल, असेही त्यांनी स्पष्ट केले.
या प्रकरणात भ्रष्टाचार झालाच नाही, असे म्हणणे पूर्णपणे चुकीचे आहे. पाणीपुरवठा विभागातील साहित्याच्या साठा नोंदवही (स्टॉक रजिस्टर) गहाळ झाल्याप्रकरणी संबंधित कर्मचाऱ्याविरोधात फिर्याद दाखल झाली असून प्रकरण न्यायालयात आहे. तसेच सर्वांच्या स्वाक्षऱ्यांनी बिले अदा करण्यात आली होती. वारंवार आठ ते बारा दिवसांच्या अंतराने दहा ते बारा लाख रुपयांची बिले काढली जात असल्याच्या संशयास्पद प्रकारावर शिंदे गटाच्या पाणीपुरवठा सदस्यांनी आक्षेप घेतला होता. त्यानंतर तिसरे बिल रोखण्यात आले. स्टॉक रजिस्टर गहाळ होणे आणि बिलांच्या व्यवहारातील संशयास्पद बाबी या सर्वांची सखोल चौकशी होणे आवश्यक आहे.

या पार्श्वभूमीवर शिंदे गटाच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांमार्फत संपूर्ण प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करण्याची मागणी करण्यात आली आहे. याबाबत ५ ऑक्टोबर रोजी जिल्हाधिकाऱ्यांकडे लेखी निवेदनही सादर करण्यात आले आहे. त्यामुळे राजीनाम्याचा विषय पुढे करून मूळ गैरव्यवहाराच्या प्रश्नाकडे दुर्लक्ष करू नये. संबंधित सर्व बाबींची कायदेशीर चौकशी करून सत्य जनतेसमोर आणावे, अशी मागणी अॅड. सावंत-कविटकर यांनी केली.

You cannot copy content of this page