हरी खोबरेकर यांचा आरोप: वेगवेगळ्या गोष्टींवर लोकांना भ्रमात ठेवणाऱ्या सत्ताधारी लोकप्रतिनिधीनी या प्रश्नाचे उत्तर दिले पाहिजे..
⚡मालवण ता.०६-:
जिल्ह्यात तीन आमदार, एक खासदार व पालकमंत्री असे सत्ताधारी लोकप्रतिनिधी असताना तसेच ग्रामपंचायती, जिल्हापरिषद अशी सत्तास्थाने भाजप व शिंदे शिवसेना महायुतीकडे असतानाही जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणा खिळखिळी बनली असून आरोग्य यंत्रणा सक्षम करण्याकडे सत्ताधारी लोकप्रतिनिधिंकडून जाणूनबुजून दुर्लक्ष केले जात आहे, लोकप्रतिनिधी केवळ बघ्याची भूमिका घेत असून जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणा सुधारण्यासाठी अजून कोणती सत्ता सत्ताधाऱ्यांना हवी आहे, असा सवाल उबाठा शिवसेनेचे मालवण तालुकाप्रमुख हरी खोबरेकर यांनी पत्रकार परिषदेत उपस्थित केला.
मालवण येथील उबाठा शिवसेना शाखा कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत हरी खोबरेकर बोलत होते. यावेळी नगरसेवक मंदार ओरसकर, तपस्वी मयेकर, माजी नगरसेविका पूजा करलकर, राधिका मोंडकर, उमेश चव्हाण आदी उपस्थित होते.
यावेळी हरी खोबरेकर म्हणाले, जिल्ह्यात खासदार, तिन्ही आमदार, पालकमंत्री हे सत्ताधारी भाजप व शिंदे शिवसेनेचे असतानाही जिल्ह्याची आरोग्य यंत्रणा व्हेंटिलेटरवर आहे. ग्रामपंचायती, जिल्हा परिषद तसेच उपमुख्यमंत्री व मुख्यमंत्रीही महायुतीचे असताना जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणा सक्षम का नाही ?असा आमचा सत्ताधारी लोकप्रतिनिधीना सवाल आहे. ग्रामपंचायती व जिल्हा परिषदेवर सत्ता असताना किती प्राथमिक आरोग्य उपकेंद्रे सक्षम आहेत, किती एमबीबीएस डॉक्टर आहेत, किती परिचारिक आहेत ? याचा आढावा पालकमंत्री यांनी घेतला आहे का? असे सवाल हरी खोबरेकर यांनी केले.
आज जिल्ह्यात एक आरोग्यसेवक दोन दोन ठिकाणी काम करतोय. जिल्ह्यातील ग्रामीण रुग्णालयांमध्ये डॉक्टर आहेत तर सुविधा नाहीत किंवा सुविधा आहेत तर डॉक्टर नाहीत अशी परिस्थिती आहे. मालवण ग्रामीण रुग्णालयात सात महिन्यासाठी तात्पुरते डॉक्टर आणले जातात व त्याची बातमी देऊन स्थानिक आमदार स्वतःची पाठव थोपटून घेण्याचे काम करत आहेत, अशी टिकाही खोबरेकर यांनी केली.
मालवण ग्रामीण रुग्णालयात आलेला रुग्ण जिल्हा रुग्णालयात हलवीला जातो, जिल्हा रुग्णालयात आलेला रुग्ण गोव्याला रुग्ण गोव्याला हलविला जातो, ही परिस्थिती किती दिवस राहणार आहे ? वेगवेगळ्या गोष्टींवर लोकांना भ्रमात ठेवणाऱ्या सत्ताधारी लोकप्रतिनिधीनी या प्रश्नाचे उत्तर दिले पाहिजे, असेही खोबरेकर म्हणाले.
विधानसभेत जिल्ह्यातील एक आमदार जनतेचे प्रश्न मांडतोय, म्हणजेच पालकमंत्री जनतेचे प्रश्न सोडविण्यात कमी पडले हेच अपयश दाखविण्याचे काम आमदार करत आहेत, अशी टीकाही हरी खोबरेकर यांनी केली.
माजी आमदार वैभव नाईक, माजी खासदार विनायक राऊत यांच्या अथक प्रयत्नातून तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या माध्यमातून जिल्ह्यात शासकीय मेडिकल कॉलेज मंजूर झाले. तसेच वैभव नाईक यांनी कुडाळ मध्ये महिला रुग्णालय आणले, तेथे सर्वसामान्यांना मोफत उपचार मिळत होते. मात्र, आताच्या सत्ताधारी लोकप्रतिनिधीकडून मेडिकल कॉलेज व महिला रुग्णालय मजबूत करण्याऐवजी खिळखिळे करण्याचा डाव सुरु आहे. जिल्ह्यातील आरोग्य केंद्रे सक्षम करण्यासाठी जिल्हा परिषदेकडून जे प्रयत्न होणे आवश्यक आहे ते केले जात नाहीत, आरोग्य सेवा खिळखिळी होत असताना सत्ताधारी प्रतिनिधी बघ्याची भूमिका घेणार आहेत का? असा सवाल हरी खोबरेकर यांनी उपस्थित केला.
आरोग्य सेवेत लोकांचा होणारा खेळखंडोबा थांबवून सक्षम आरोग्य यंत्रणा निर्माण केली पाहिजे. मात्र सर्व सत्तास्थाने असूनही सत्ताधाऱ्यांकडून आरोग्य सेवेकडे जाणून बुजून दुर्लक्ष केला जातोय, असा आरोप हरी खोबरेकर यांनी केला.
