Headlines

वीज ग्राहकांच्या प्रश्नांसाठी ओरोसमध्ये १० ऑगस्टला जिल्हास्तरीय वीज परिषद…

⚡सिंधुदुर्गनगरी ता ६-:
सिंधुदुर्ग जिल्हा वीज ग्राहक संघटना सिंधुदुर्ग, यांच्यासह जिल्ह्यातील विविध संघटनांच्या संयुक्त विद्यमाने सोमवार १० ऑगस्ट २०२६ रोजी ओरोस येथील इच्छापूर्ती मंगल कार्यालय येथे सकाळी १० ते दुपारी १२ या वेळेत “जिल्हास्तरीय वीज परिषद “आयोजित करण्यात आली आहे.

या परिषदेमध्ये सिंधुदुर्ग जिल्ह्यातील घरगुती व्यवसायिक, औद्योगिक शेतकरी तसेच सर्वसामान्य वीज ग्राहकांना भेडसावणाऱ्या विविध समस्या, अपघातास कारणीभूत असलेल्या लोम्बकळणाऱ्या विजतारा बदलणे, अनेक ठिकाणी वापरात नसलेले जुने लोखंडी खांब बदलणे, आवश्यक ठिकाणी गार्डिंग करणे ,वारंवार खंडित होणारा वीज पुरवठा, वीज बिलाबाबतच्या तक्रारी ,अवाजवी भरमसाठ येणारी विजबिले ,नवीन विज जोडणी, स्मार्ट मीटर संदर्भातील शंका, ग्राहक सेवा, तांत्रिक अडचणी तसेच ग्राहकांच्या सूचना व अपेक्षा यावर सविस्तर चर्चा करण्यात येणार आहे. याशिवाय वारंवार खंडित होणाऱ्या वीज पुरवठ्यामुळे व्यापारी, लघु उद्योजक ,हॉटेल व्यवसाय, कोल्ड स्टोरेज सेवा, उद्योग तसेच इतर व्यावसायिक आस्थापनांचे मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान होत आहे. अनपेक्षित वीज खंडित झाल्यामुळे व्यापारावर विपरीत परिणाम होत आहे. यंत्रसामग्री व इलेक्ट्रिक उपकरणाचे नुकसान होते. ग्राहक सेवेत अडथळे निर्माण होतात आणि स्थानिक कर्तव्यवस्थेवरही त्याचा प्रतिकूल परिणाम होत आहे. या गंभीर प्रश्नांवर कायमस्वरूपी उपाययोजना नियोजनबद्द २४ तास अखंडीत विज पुरवठा तसेच महावितरण, व्यापारी संघटना आणि लोकप्रतिनिधी यांच्यात प्रभावी समन्वय निर्माण करण्याच्या दृष्टीने या परिषदेत विशेष चर्चा करण्यात येणार आहे. तसेच कोकणातील गणेशोत्सव हा लाखो भाविकांच्या श्रद्धेचा आणि पर्यटनाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा उत्सव असल्यामुळे या कालावधीत अखंडित सुरक्षित दर्जेदार व सुरळीत वीज पुरवठा उपलब्ध राहणे ही काळाची गरज आहे. यासाठी पूर्व नियोजन अतिरिक्त तांत्रिक मनुष्यबळ, आपत्कालीन दुरुस्ती पथके ,आवश्यक साहित्याचा पुरेसा साठा, संवेदनशील भागाचे पूर्व सर्वेक्षक तसेच तक्रारीचे तातडीने निवारण याबाबत ठोस कृती आराखडा तयार करण्यावरही या परिषदेत विशेष भर दिला जाणार आहे. या परिषदेस महावितरणच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनाही निमंत्रित करण्यात आले असून उपस्थित वीज ग्राहकांच्या शंकांचे थेट निरसन व्हावे यासाठी “स्मार्ट मीटर संवाद” कार्यक्रम आयोजित करण्याबाबतही त्यांना विनंती करण्यात आली असल्याची माहिती सिंधुदुर्ग जिल्हा वीज ग्राहक संघटना जिल्हा समन्वयक नंदन वेंगुर्लेकर यांनी दिली.

You cannot copy content of this page