*💫मालवण दि.१५-:* कोकण मराठी साहित्य परिषद शाखा मालवण यांच्या वतीने गझलभूषण श्री मधुसुदन नानिवडेकर यांच्या हस्ते प्रसिद्ध ललित लेखक श्री. चंद्रकांत पारकर यांचा त्यांच्या साहित्यिक योगदानाबद्दल एका कार्यक्रमात शाल, श्रीफळ व पुस्तक देवून सत्कार करण्यात आला. यावेळी केंद्रीय सदस्य श्री. रुजारिओ पिंटो, कोमसाप मालवण शाखेचे अध्यक्ष श्री. सुरेश ठाकूर, सेवांगण मालवणचे कार्याध्यक्ष श्री. दीपक भोगटे, संगीतकार श्री. माधव गावकर श्री. सदानंद कांबळी यांच्यासह कोमसाप मालवणचे सदस्य उपस्थित होते. श्री. चंद्रकांत पारकर यांनी नुकतेच कोकणातील व्यक्तिरेखा रेखाटणारे ‘उधाण’ व ‘कोकणातील माणसे’ ही पुस्तके प्रसिद्ध केली. त्यांनी आता पर्यंत जवळ जवळ पाचशे कथा व सुमारे दहा कादंब-या लिहिल्या आहेत. महाराष्ट्र शासनाच्या भाषा संचलनालय विभागात ‘विभागीय सहाय्यक भाषा संचालक’ पदावरुन नुकतेच ते सेवानिवृत्त झाले. आपल्या कोकणातील वास्तव्यात लक्षात राहिलेली कोकणची माणसे, इथले प्रसंग त्यांनी आपल्या पुस्तकात मांदले आहेत. त्यांची मालवणी भाषे एवढीच इअथल्या संस्कृतीवरील पकड त्यांच्या लेखनातून दिसून येते. यावेळी बोलताना श्री. सुरेश ठाकूर यांनी त्यांच्या साहित्यिक योगदानाचे कौतुक केले. सत्काराला उत्तर देताना श्री. चंद्रकांत पारकर यांनी कोमसाप मालवणच्या विविध उपक्रमांचे कौतुक केले. तसेच वाचन संस्कृती वाढावी यासाठी आपली प्रकाशित पुस्तके कोमसाप मालवणच्या सदस्यांना भेट म्हणून दिली.कार्यक्रमाचे सूत्रसंचलन सौ. श्रद्धा वाळके यांनी केले तर आभार सौ. भावना मुणगेकर यांनी मानले.
ललित लेखक श्री. चंद्रकांत पारकर यांचा को. म. सा.प. मालवण शाखेतर्फे सत्कार …!
