Headlines

महिला बचत गटांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी उमेदने पुढाकार घ्यावा…

आमदार निलेश राणे:कुडाळ तालुक्यात बचत गटांना ८ वाहने वितरित,२५ पैकी आतापर्यंत १३ वाहनांचे वाटप

⚡कुडाळ ता.३०-: महिला बचत गटांना आर्थिकदृष्ट्या सक्षम आणि स्वावलंबी बनविण्यासाठी शासन विविध योजना राबवत आहे. मात्र, केवळ योजनांपुरते मर्यादित न राहता महिलांच्या उत्पादनांना बाजारपेठ उपलब्ध होण्यासाठी आणि त्यांच्या व्यवसायाला चालना मिळण्यासाठी उमेद अभियानाने जिल्ह्यात विशेष व्यवस्था उभारावी. या उपक्रमाची सुरुवात कुडाळ तालुक्यातून करावी, जेणेकरून ही व्यवस्था संपूर्ण महाराष्ट्रासाठी आदर्श ठरेल, असे प्रतिपादन आमदार निलेश राणे यांनी केले.
कुडाळ पंचायत समिती, उमेद-महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान सिंधुदुर्ग आणि महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळ सिंधुदुर्ग यांच्या संयुक्त विद्यमाने सेवा संकल्प अभियानांतर्गत तालुक्यातील महिला बचत गटांना शेतमाल व अन्नपदार्थ वाहतुकीसाठी वाहनांचे वितरण करण्यात आले. शुक्रवारी उद्यमनगर येथील वासुदेवानंद ट्रेड सेंटर येथे आमदार निलेश राणे यांच्या हस्ते ८ वाहनांचे वितरण करण्यात आले.
यावेळी जिल्हा परिषद उपाध्यक्ष दादा साईल, सभापती मिलिंद नाईक, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष काका कुडाळकर, जिल्हा परिषद सदस्य दीपक नारकर, दीपलक्ष्मी पडते व रूपेश कानडे, गटविकास अधिकारी प्रवीण हिर्लेकर, उमेद अभियानाचे तालुका व्यवस्थापक गणेश राठोड यांच्यासह लोकप्रतिनिधी, अधिकारी आणि बचत गटांतील महिला उपस्थित होत्या.
आमदार राणे म्हणाले, मंजूर २५ वाहनांपैकी यापूर्वी ५ वाहनांचे वितरण करण्यात आले असून, आज आणखी ८ वाहनांचे वाटप होत आहे. या वाहनांचा निश्चितच महिला बचत गटांना फायदा होईल. राज्यातील महायुती सरकार महिलांना सक्षम आणि स्वावलंबी बनविण्यासाठी प्रयत्नशील आहे. तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पुढाकारातून सुरू झालेल्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ आजही महिलांना मिळत आहे. त्याचबरोबर उमेद अभियानाच्या माध्यमातून बचत गटांना व्यवसायासाठी आवश्यक सुविधा उपलब्ध करून दिल्या जात आहेत.
बचत गटांच्या उत्पादनांना व्यापक बाजारपेठ मिळावी, त्यांच्या मालाची वाहतूक आणि विक्री सुलभ व्हावी, यासाठी उमेद अभियानाने जिल्हास्तरावर नियोजन करावे. कुडाळमधून सुरू होणारा हा उपक्रम राज्यासाठी आदर्श ठरावा, अशा सूचना आपण तालुका अभियान व्यवस्थापक गणेश राठोड यांना दिल्याचेही त्यांनी सांगितले. युती सरकारच्या माध्यमातून जिल्ह्यात विविध योजना राबविल्या जात असून विकासकामांसाठी भरीव निधी उपलब्ध होत असल्याबद्दल त्यांनी शासनाचे आभार मानले.
सभापती मिलिंद नाईक म्हणाले, शासनाकडून उपलब्ध करून देण्यात आलेल्या वाहनांचा महिला बचत गटांनी योग्य पद्धतीने वापर करून आपल्या व्यवसायाची वृद्धी करावी. या उपक्रमातून महिलांनी आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी व्हावे. कुडाळ तालुक्यात उमेद अभियानाचे काम चांगले असून, अनेक बचत गटांनी दिल्लीपर्यंत मजल मारली आहे. भविष्यातही उमेदच्या माध्यमातून असेच उल्लेखनीय काम उभे राहील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
जिल्हा परिषद सदस्य दीपक नारकर यांनी कुडाळ येथील गावठी आठवडा बाजाराच्या जागेत महिला बचत गटांसाठी व्यापारी संकुल उभारण्यात यावे, अशी मागणी केली. प्रास्ताविक गणेश राठोड यांनी केले.

You cannot copy content of this page