लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, शाळा आणि सिग्मा करिअर अकॅडमीचा संयुक्त उपक्रम..

⚡कुडाळ ता.३०-: भ्रष्टाचारमुक्त महाराष्ट्र आणि देशाच्या निर्मितीसाठी नागरिकांमध्ये जनजागृती व्हावी, तसेच भ्रष्टाचाराचे समूळ उच्चाटन करण्यासाठी समाजातील प्रत्येक घटकाने सक्रिय सहभाग घ्यावा, या उद्देशाने लाचलुचपत प्रतिबंधक विभाग सिंधुदुर्ग यांच्या वतीने आवळेगाव येथे जनजागृती रॅलीचे आयोजन करण्यात आले.
भ्रष्टाचार निर्मूलन दक्षता जनजागृती सप्ताहानिमित्त लाचलुचपत प्रतिबंधक विभाग सिंधुदुर्ग, आवळेगाव हायस्कूल व कला-वाणिज्य उच्च माध्यमिक विद्यालय आणि सिग्मा करिअर अकॅडमी यांच्या संयुक्त सहकार्याने ही रॅली काढण्यात आली. यामध्ये विद्यार्थी, प्रशिक्षणार्थी आणि प्रशिक्षकांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला.
यावेळी आवळेगाव हायस्कूलचे मुख्याध्यापक दशरथ काळे, शिक्षक धुमाळे, पालव, कांबळे, लिपिक वेदांश सावंत, सिग्मा करिअर अकॅडमीचे संचालक संदेश ठाकूर, सविता पाताडे, क्रीडा शिक्षक राहुल सर तसेच विद्यार्थी उपस्थित होते. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पोलीस उपअधीक्षक संगीता पाटील व त्यांच्या सहकाऱ्यांनी उपस्थितांना मार्गदर्शन करून रॅलीला संबोधित केले.
यंदा २६ ऑक्टोबर ते १ नोव्हेंबर २०२६ या कालावधीत भ्रष्टाचार जनजागृती सप्ताह साजरा करण्यात येत असून, ‘सत्यनिष्ठेतून समृद्धीकडे’ ही यावर्षीची संकल्पना आहे. भ्रष्टाचारमुक्त महाराष्ट्र आणि देश घडविण्यासाठी प्रत्येकाने आपली सत्यनिष्ठा जपत सक्रिय सहभाग नोंदवावा, असे आवाहन यावेळी करण्यात आले.
भ्रष्टाचारासंदर्भात कोणतीही तक्रार असल्यास नागरिकांनी निर्भयपणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाशी संपर्क साधावा, असे आवाहन रॅलीच्या माध्यमातून करण्यात आले. यासाठी विभागाचा टोल फ्री क्रमांक १०६४, संपर्क क्रमांक ०२३६२-२२२२८९ आणि व्हॉट्सॲप क्रमांक ९९२२८९१०६४ हे क्रमांक फलकांद्वारे नागरिकांपर्यंत पोहोचविण्यात आले.
