पाच ते सहा महिन्यांचे मानधन थकीत; जिल्हा परिषद सदस्य नितीन राऊळ यांची शिक्षणाधिकाऱ्यांकडे मागणी

बांदा/प्रतिनिधी
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शाळांमध्ये कार्यरत असलेल्या पोषण आहार मदतनीसांचे मागील पाच ते सहा महिन्यांचे मानधन अद्याप थकीत असून, दिवाळीपूर्वी हे मानधन संबंधितांच्या बँक खात्यात तातडीने जमा करावे, अशी मागणी इन्सुली जिल्हा परिषद सदस्य नितीन राऊळ यांनी जिल्हा परिषद शिक्षणाधिकारी (प्राथमिक) यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
जिल्ह्यातील पोषण आहार मदतनीस यांच्या खात्यावर केवळ एका महिन्याचे मानधन जमा झाले असून, उर्वरित मानधन अद्याप मिळालेले नाही. अत्यंत अल्प मानधनावर काम करणाऱ्या या मदतनीसांवर आपल्या कुटुंबाच्या उदरनिर्वाहाची जबाबदारी आहे. अशा परिस्थितीत सलग पाच ते सहा महिने मानधन मिळत नसल्याने त्यांना आर्थिक अडचणींचा सामना करावा लागत आहे.
दिवाळीसारखा महत्त्वाचा सण जवळ आलेला असताना मानधन थकीत राहणे ही गंभीर बाब आहे. सणासुदीच्या काळातही हक्काचे मानधन मिळत नसल्याने या कर्मचाऱ्यांमध्ये नाराजीचे वातावरण आहे. त्यांच्या आर्थिक अडचणींचा विचार करून प्रशासनाने या प्रश्नाकडे गांभीर्याने पाहणे आवश्यक आहे.
शिक्षणाधिकाऱ्यांनी या प्रकरणात तातडीने लक्ष घालून पोषण आहार मदतनीसांचे पाच ते सहा महिन्यांचे थकीत मानधन दिवाळीपूर्वी बँक खात्यात जमा करण्यासाठी आवश्यक कार्यवाही करावी. तसेच भविष्यात मानधन नियमितपणे वेळेत मिळेल, याची दक्षता घ्यावी, अशी मागणी नितीन राऊळ यांनी निवेदनातून केली आहे.
फोटो:-
पासपोर्ट.
