Headlines

बांद्यात भरवस्तीत बिबट्याचा मुक्त संचार; नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण..

देऊळवाडी, आरोसबाग, रामनगर परिसरात तीन दिवसांपासून वावर; गुरांच्या गोठ्यानजीक दर्शन..

⚡बांदा ता.३०-: बांदा शहरातील देऊळवाडी भरड तसेच चव्हाणवाडी परिसरात भरवस्तीत बिबट्याचे दर्शन झाल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. गेल्या तीन दिवसांपासून देऊळवाडी, आरोसबाग आणि रामनगर परिसरात बिबट्याचा मुक्त संचार सुरू असून, गुरुवारी सायंकाळी गुरांच्या गोठ्यानजीक बिबट्या दिसल्याने शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण पसरले आहे.
गुरुवारी सायंकाळी सुमारे ७.३० वाजण्याच्या सुमारास देऊळवाडी येथे गुरांना चारा देण्यासाठी गेलेल्या बाबू चव्हाण या युवकाला गुरांच्या गोठ्यानजीक बिबट्याचे दर्शन झाले. प्रसंगावधान राखत त्यांनी बिबट्याला हुसकावून लावले आणि तातडीने याची माहिती स्थानिक ग्रामस्थांना दिली.
घटनेची माहिती बांदा वनविभागाचे वनपाल नागेश खोराटे यांना देण्यात आली. त्यांनी तातडीने वनरक्षक गजानन सकट यांना घटनास्थळी पाठविले. वनरक्षक सकट यांनी स्थानिक ग्रामस्थांच्या मदतीने परिसरात बिबट्याचा शोध घेतला. यावेळी खबरदारीचा उपाय म्हणून तसेच बिबट्याला मानवी वस्तीतून दूर हुसकावण्यासाठी अॅटमबॉम्ब फोडण्यात आले.
दरम्यान, शुक्रवारी सकाळी वनविभागाच्या रेस्क्यू विभागाचे बबन रेडकर आणि वनरक्षक सुयश पाटील यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. परिसरातील काही ठिकाणी बिबट्याच्या पायांचे ठसे आढळून आले आहेत. त्यामुळे या भागात बिबट्याचा वावर असल्याचे स्पष्ट झाले आहे.
देऊळवाडी परिसरात मोठ्या प्रमाणात गुरे असल्याने शेतकरी आणि पशुपालकांमध्ये विशेष भीती निर्माण झाली आहे. बिबट्याचा वावर मानवी वस्तीजवळ असल्याने नागरिकांनी रात्रीच्या वेळी एकट्याने बाहेर पडणे टाळावे, तसेच गुरांच्या सुरक्षिततेची काळजी घ्यावी, असे आवाहन करण्यात येत आहे. वनविभागाने या परिसरात गस्त वाढवून बिबट्याच्या हालचालींवर लक्ष ठेवावे, अशी मागणी स्थानिक ग्रामस्थांकडून होत आहे.

You cannot copy content of this page