Headlines

स्त्रीशक्तीच्या कर्तृत्वाला ‘लक्ष्मी आधार’चे व्यासपीठ…

वेंगुर्ल्यात महिला उद्योजिकांच्या भव्य प्रदर्शनाचे सौ. वेदिका परब यांच्या हस्ते उद्घाटन; १० उद्योजिकांचा विशेष सन्मान..

वेंगुर्ला, ता. ३० : महिलांच्या हाताला कौशल्याची जोड, कष्टांना संधी आणि त्यांच्या उत्पादनांना बाजारपेठ मिळाली, तर महिला केवळ कुटुंबाचा आधार न राहता समाजाच्या आर्थिक विकासातही महत्त्वाची भूमिका बजावू शकतात. याच उद्देशाने इनरव्हील क्लब वेंगुर्ला आणि लक्ष्मी आधार सेवा फाउंडेशन, वेंगुर्ला यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ‘लक्ष्मी आधार’ भव्य प्रदर्शन व विक्री महोत्सव २०२६ उत्साहात पार पडला. या प्रदर्शनाचे उद्घाटन सौ. वेदिका विशाल परब यांच्या हस्ते करण्यात आले.

यावेळी बोलताना सौ. वेदिका परब म्हणाल्या, “महिलांना सहानुभूतीची नव्हे, तर त्यांच्या कर्तृत्वाला संधी, उत्पादनांना बाजारपेठ आणि स्वप्नांना भक्कम पाठबळाची गरज आहे. महिलांच्या हाताला कला, मनाला कल्पकता आणि कष्टांना संधी मिळाली, तर त्या केवळ संसारच नव्हे, तर संपूर्ण समाज घडवू शकतात.” या प्रदर्शनात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या १० महिला उद्योजिकांचा विशेष सन्मान करण्यात आला.

हा सन्मान महिला उद्योजिकांच्या कष्टाला प्रतिष्ठा देणारा आणि त्यांच्या व्यावसायिक वाटचालीला प्रोत्साहन देणारा ठरला. कार्यक्रमाला नर्मदा आई संस्थेच्या अध्यक्षा सौ. संध्या तेरसे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होत्या. प्रदर्शनात महिलांनी स्वतःच्या कल्पकतेतून व मेहनतीतून तयार केलेल्या विविध हस्तकला वस्तू, गृहउपयोगी साहित्य, महिला निर्मित उत्पादने तसेच विविध रुचकर खाद्यपदार्थांचे स्टॉल नागरिकांचे आकर्षण ठरले. या माध्यमातून महिला उद्योजिकांना थेट ग्राहकांपर्यंत आपली उत्पादने पोहोचविण्याची तसेच व्यवसायाला बाजारपेठ मिळविण्याची संधी उपलब्ध झाली. “महिला उद्योजिकेच्या स्टॉलवरून केलेली प्रत्येक खरेदी ही तिच्या व्यवसायाला मिळालेली संजीवनी आणि आत्मविश्वासाला मिळालेली नवी उभारी असते,” असे सांगत स्थानिक महिला उद्योजिकांनी तयार केलेल्या उत्पादनांना नागरिकांनी प्राधान्य द्यावे, असे आवाहन सौ. वेदिका परब यांनी केले.

महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करणे, त्यांच्या हाताला रोजगार उपलब्ध करून देणे, स्थानिक उत्पादनांना बाजारपेठ मिळवून देणे आणि कुटुंबांना आर्थिक स्थैर्य देणे, या व्यापक उद्देशाने हा उपक्रम राबविण्यात आला. त्यामुळे ‘लक्ष्मी आधार’ महोत्सव हा केवळ प्रदर्शन व विक्रीपुरता मर्यादित न राहता महिला स्वावलंबनाचा प्रेरणादायी उपक्रम ठरला. इनरव्हील क्लब वेंगुर्ला आणि लक्ष्मी आधार सेवा फाउंडेशनने महिला उद्योजिकांना उपलब्ध करून दिलेल्या या व्यासपीठाचे उपस्थितांकडून कौतुक करण्यात आले. स्त्रीचा सन्मान आणि तिचे स्वावलंबन हेच समाजाच्या प्रगतीचे बळ आहे, हा संदेश या उपक्रमातून प्रभावीपणे देण्यात आला.”

You cannot copy content of this page