मालवण (प्रतिनिधी)

मालवण येथील स. का. पाटील सिंधुदुर्ग महाविद्यालयाच्या एनसीसी विभागाची माजी सिनिअर अंडर ऑफिसर गीतांजली चंद्रकांत चव्हाण हिची महाराष्ट्र सुरक्षा दलात निवड झाली आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यात पार पडलेल्या पोलीस शिपाई भरती प्रक्रियेतील मैदानी चाचणी व लेखी परीक्षेतील उत्कृष्ट गुणवत्तेच्या जोरावर तिने हे यश संपादन केले आहे.
गीतांजली चव्हाण हि ५८ महाराष्ट्र बटालियन एनसीसीअंतर्गत कार्यरत होती. महाविद्यालयात शिक्षण घेत असताना तिने एनसीसीच्या माध्यमातून शिस्त, नेतृत्वगुण, शारीरिक क्षमता आणि देशसेवेची भावना आत्मसात केली. महाविद्यालयाचे एनसीसी विभागप्रमुख तथा असोसिएट एनसीसी ऑफिसर लेफ्टनंट प्राध्यापक डॉ. एम. आर. खोत यांचे तिला मोलाचे मार्गदर्शन लाभले.
गीतांजलीच्या या यशाला एक अत्यंत भावनिक किनार आहे. काही महिन्यांपूर्वीच अपघातात तिच्या वडिलांचे निधन झाले. कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळलेला असतानाही ती खचली नाही आणि तिने आपल्या ध्येयाची वाटचाल सुरूच ठेवली. या अत्यंत कठीण परिस्थितीत मिळवलेले हे यश तिच्या दुर्दम्य इच्छाशक्तीचे आणि कष्टाचे प्रतीक आहे.
या प्रसंगी डॉ. खोत यांनी विद्यार्थ्यांना एनसीसीमध्ये सहभागी होण्याचे आवाहन केले. एनसीसी हे केवळ प्रशिक्षणाचे व्यासपीठ नसून पोलीस, सैन्यदल, नौदल तसेच विविध सुरक्षा सेवांमध्ये करिअर घडवण्यासाठी महत्त्वपूर्ण पाऊल ठरते, असे त्यांनी स्पष्ट केले.
गीतांजलीच्या या उज्ज्वल यशाबद्दल महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य कैलास राबते, लेफ्टनंट प्रा. डॉ. एम. आर. खोत, कृ. सी. देसाई शिक्षण संस्थेचे अध्यक्ष किरण ठाकूर, कार्याध्यक्ष साईनाथ चव्हाण, सेक्रेटरी गणेश कुशे यांच्यासह संस्थेचे सर्व पदाधिकारी, तहसीलदार गणेश लव्हे, नगरपालिकेचे पदाधिकारी, ५८ महाराष्ट्र बटालियनचे कमांडिंग ऑफिसर कर्नल अजय राजशेखर, लेफ्टनंट कर्नल तनुज मंडलिक, सुभेदार मेजर सुधाकर कुलदीपकर, तसेच महाविद्यालयाचा प्राध्यापक वर्ग, अधिकारी व एनसीसी कॅडेट्सनी तिचे अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत.
