नगरपंचायत कर्मचाऱ्यांना संदेश पारकरांकडून शाबासकी:वयोवृद्ध नागरिकाला बैलाने मारल्याचा व्हिडिओ झाला होता व्हायरल..

⚡कणकवली ता.२९-: शहरात गेल्या काही दिवसांपासून एका मारकुट्या बैलाने धुमाकूळ घातला होता. या बैलामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. काही दिवसांपूर्वी या बैलाने एका वयोवृद्ध नागरिकाला मारहाण केल्याची घटना घडली होती. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाल्यानंतर शहरातील मोकाट जनावरांचा प्रश्न ऐरणीवर आला होता.
या घटनेची दखल कणकवली नगरपंचायत प्रशासनाने घेतली. नागरिकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने या मारकुट्या बैलाला पकडण्यासाठी नगरपंचायत प्रशासनाकडून प्रयत्न करण्यात आले. अखेर आज नगरपंचायतीच्या कर्मचाऱ्यांना या बैलाला पकडण्यात यश आले. त्यामुळे शहरातील नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे.
या बैलाला पकडण्यासाठी नगरपंचायत कर्मचाऱ्यांनी केलेल्या प्रयत्नांचे नगराध्यक्ष संदेश पारकर यांनी कौतुक केले. नागरिकांच्या सुरक्षिततेशी संबंधित प्रश्नाची दखल घेऊन कर्मचाऱ्यांनी केलेल्या कामाबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केले.
शहरात मोकाट जनावरांमुळे नागरिकांना होणारा त्रास आणि अपघातांचा संभाव्य धोका लक्षात घेता, अशा घटनांवर वेळीच उपाययोजना करणे आवश्यक आहे. कणकवलीतील या मारकुट्या बैलाला पकडण्यात आल्याने नागरिकांनी सुटकेचा निःश्वास सोडला असून, शहरातील मोकाट जनावरांच्या प्रश्नावर कायमस्वरूपी उपाययोजना करण्याची गरजही या घटनेतून अधोरेखित झाली आहे.
