Headlines

दिल्लीतील ‘महाराष्ट्र राज्य ग्रामविकास परिषद’ नियोजन बैठकीसाठी सिंधुदुर्ग जि.प. अध्यक्ष-उपाध्यक्षांना निमंत्रण…

⚡कुडाळ ता.२९-: ‘एमआयटी स्कूल ऑफ गव्हर्नमेंट’, पुणे यांच्या अंतर्गत ‘राष्ट्रीय सरपंच संसद’ आणि ‘राष्ट्रीय जिल्हा परिषद व पंचायत समिती सदस्य असोसिएशन’ यांच्या संयुक्त विद्यमाने दिल्ली येथे आयोजित करण्यात येणाऱ्या ‘महाराष्ट्र राज्य ग्रामविकास परिषद’ नियोजन बैठकीसाठी सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेचे अध्यक्ष प्रमोद कामत आणि उपाध्यक्ष दादा साईल यांना निमंत्रण देण्यात आले.
केंद्र शासनाच्या ग्रामविकास व पंचायतराज विभागासमोर महाराष्ट्रातील ग्रामविकासाशी संबंधित विविध समस्या, ज्वलंत प्रश्न आणि विकासविषयक मुद्द्यांचे अभ्यासपूर्ण सादरीकरण करून त्यांच्या निराकरणासाठी ठोस उपाययोजना व्हाव्यात, या उद्देशाने दिल्ली येथे ही परिषद आयोजित करण्यात येत आहे.
या परिषदेत महाराष्ट्राचे ग्रामविकास व पंचायतराज मंत्री जयकुमार गोरे, राज्यातील जिल्हा परिषद अध्यक्षांच्या अधिपत्याखाली कार्यरत असलेल्या १४ जिल्हा परिषदांचे अध्यक्ष-उपाध्यक्ष, निवडक सरपंच तसेच राष्ट्रीय सरपंच संसदेचे पदाधिकारी सहभागी होणार आहेत.
दिल्लीतील परिषदेसाठी केंद्र सरकारला सादर करण्यात येणारे लेखी निवेदन तयार करण्यासाठी आणि कार्यक्रमाचे नियोजन करण्यासाठी प्रथम एमआयटी, पुणे येथे नियोजन बैठक आयोजित करण्यात आली आहे. ही बैठक ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांच्या अध्यक्षतेखाली, एमआयटी स्कूल ऑफ गव्हर्नमेंटचे प्रणेते डॉ. राहुल कराड यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार आहे.
या पार्श्वभूमीवर ओरस येथे जिल्हा परिषद अध्यक्ष प्रमोद कामत यांची, तर कुडाळ येथे उपाध्यक्ष दादा साईल यांची भेट घेऊन नियोजन बैठकीचे निमंत्रण देण्यात आले. यावेळी राष्ट्रीय सरपंच संसदेचे कार्याध्यक्ष व प्रमुख समन्वयक योगेश पाटील, उपाध्यक्ष व सहसमन्वयक प्रकाशराव महाले, कोकण-नाशिक प्रांताध्यक्ष ॲड. नकुल पार्सेकर आणि कोकण विभागाध्यक्ष संतोष राणे उपस्थित होते. त्यांनी परिषदेसंदर्भात सविस्तर चर्चा करून बैठकीत सहभागी होण्याचे निमंत्रण दिले.

You cannot copy content of this page