संगीता पाटील:एसआरएम कॉलेजात भ्रष्टाचारविरोधी जनजागृती कार्यशाळा..

⚡कुडाळ ता.२९-: भ्रष्टाचारमुक्त समाज निर्माण करणे ही केवळ शासनाची जबाबदारी नसून प्रत्येक नागरिकाचे कर्तव्य आहे. समाजात सत्यनिष्ठा आणि प्रामाणिकपणाची भावना रुजवून भ्रष्टाचाराविरोधात प्रत्येकाने सक्रिय भूमिका बजावणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पोलीस उपअधीक्षक संगीता पाटील यांनी केले.
भ्रष्टाचार निर्मूलन दक्षता जनजागृती सप्ताहानिमित्त लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, सिंधुदुर्ग यांच्या वतीने संत राऊळ महाराज महाविद्यालय, कुडाळ येथे जनजागृती कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी प्राध्यापक आणि विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना संगीता पाटील बोलत होत्या.
यंदा २६ ऑक्टोबर ते १ नोव्हेंबर या कालावधीत भ्रष्टाचार जनजागृती सप्ताह साजरा करण्यात येत आहे. ‘सत्यनिष्ठेतून समृद्धीकडे’ ही या सप्ताहाची संकल्पना आहे. भ्रष्टाचारमुक्त महाराष्ट्र आणि देश घडविण्यासाठी नागरिकांनी सक्रिय सहभाग नोंदवावा. सत्यनिष्ठा हीच समृद्ध समाजाची खरी ताकद असून, भ्रष्टाचाराच्या विरोधात नागरिकांनी निर्भयपणे पुढे यावे, असे आवाहन या कार्यशाळेत करण्यात आले.
यावेळी महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉ. स्मिता सूरवसे, प्राध्यापक आवटी, प्राध्यापक चव्हाण यांच्यासह अन्य प्राध्यापक आणि विद्यार्थी उपस्थित होते. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या वतीने पोलीस निरीक्षक विद्या जाधव, पोलीस निरीक्षक दीपक माळी, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक सुनील सावंत तसेच पोलीस अंमलदार प्रीतम कदम, विजय देसाई, गोविंद तेली, महेश जगताप, भूषण नाईक, योगेश मुंढे आणि नागेश खोत उपस्थित होते.
भ्रष्टाचारासंदर्भात तक्रार करण्यासाठी नागरिकांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या टोल फ्री क्रमांक १०६४, दूरध्वनी क्रमांक ०२३६२-२२२२८९ किंवा व्हॉट्सॲप क्रमांक ९९२२८९१०६४ यावर संपर्क साधावा, असे आवाहन विभागाच्या वतीने करण्यात आले.
