आमदार निलेश राणे:कुडाळमध्ये विकासकामांचा धडाका,रस्ते काँक्रीटीकरणासह विविध उपक्रमांचा शुभारंभ

⚡कुडाळ ता.३०-: कुडाळ शहराचा दर्जेदार शहर म्हणून विकास करण्यासोबतच कुडाळ एमआयडीसीचा विकासात्मक कायापालट करण्यात येणार आहे. एमआयडीसी परिसरात भव्य स्टेडियम उभारण्याचा मानस असून शहरातही विविध विकासकामे हाती घेण्यात येणार आहेत, अशी ग्वाही आमदार निलेश राणे यांनी दिली. शहरातील रस्त्यांची कामे दर्जेदार पद्धतीने आणि निर्धारित मुदतीत पूर्ण करण्याच्या सूचनाही त्यांनी संबंधित यंत्रणांना दिल्या.
कुडाळ येथे आज आमदार निलेश राणे यांच्या हस्ते विविध विकासकामांचे भूमिपूजन, लोकार्पण आणि महिला बचत गटांना वाहन वितरण कार्यक्रम पार पडले. यामध्ये कुडाळ एमआयडीसी सर्कल ते पिंगुळी म्हापसेकर तिठा या रस्त्याचे रुंदीकरण व काँक्रीटीकरण तसेच एमआयडीसीमधील अंतर्गत मुख्य रस्त्याच्या काँक्रीटीकरण कामाचा शुभारंभ करण्यात आला.
शहरातील डॉ. पाटील हॉस्पिटलसमोरील नगरपंचायतीच्या उद्यानात साकारण्यात आलेल्या ज्येष्ठ नागरिक विरंगुळा केंद्राचे लोकार्पणही यावेळी करण्यात आले. ज्येष्ठ नागरिक संघाचे चंद्रकांत अणावकर यांच्या हस्ते फीत कापून या केंद्राचे उद्घाटन करण्यात आले. नगरपंचायतीच्या माध्यमातून हे केंद्र उभारण्यात आले आहे.
या कार्यक्रमाला शिवसेना जिल्हाप्रमुख संजू परब, उपजिल्हाप्रमुख आनंद शिरवलकर, नगराध्यक्ष प्राजक्ता बांदेकर-शिरवलकर, जिल्हा परिषद उपाध्यक्ष दादा साईल, सभापती मिलिंद नाईक, मुख्याधिकारी खंडू पवळ, एमआयडीसीचे उपअभियंता अविनाश रेवंडकर, एमआयडीसी इंडस्ट्रीज असोसिएशनचे अध्यक्ष मोहन होडावडेकर, काका कुडाळकर, संजय पडते, दीपलक्ष्मी पडते, दीपक नारकर, विनायक राणे, प्रकाश सावंत, ओंकार तेली, नगरसेवक अभिषेक गावडे, विलास कुडाळकर, नयना मांजरेकर, आफ्रिल करोल, राजीव कुडाळकर आदी उपस्थित होते.
दरम्यान, कुडाळ पंचायत समिती, उमेद-महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान सिंधुदुर्ग आणि महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळ सिंधुदुर्ग यांच्या संयुक्त विद्यमाने सेवा संकल्प अभियानांतर्गत तालुक्यातील महिला बचत गटांना शेतमाल व अन्नपदार्थांच्या वाहतुकीसाठी वाहनांचे वितरण करण्यात आले. उद्यमनगर येथील वासुदेवानंद ट्रेड सेंटर येथे आमदार निलेश राणे यांच्या हस्ते हा वितरण समारंभ झाला.
यावेळी गटविकास अधिकारी प्रवीण हिर्लेकर, उमेद अभियानाचे तालुका व्यवस्थापक गणेश राठोड यांच्यासह लोकप्रतिनिधी, अधिकारी आणि बचत गटांतील महिला उपस्थित होत्या.
