सिंधुदुर्गच्या ‘जलकन्ये’ने जागवल्या बालपणीच्या आठवणी; जिल्हा पोलिस क्रीडा स्पर्धांच्या समारोपात भावनिक क्षण..

⚡ओरोस, ता. ३०-: लहानपणी आईसोबत याच पोलिस परेड मैदानावर धावण्याचा सराव करण्यासाठी यायचे. त्यावेळी पोलिस भरतीसाठी तयारी करणाऱ्या युवकांना पाहून प्रेरणा मिळायची. प्रदीप चव्हाण आणि कमलेश सोनावणे या प्रशिक्षकांनी धावण्याचे तंत्र शिकविले, माझ्याकडून कठोर मेहनत घेतली आणि माझ्या क्रीडाप्रवासाला दिशा दिली. आज त्याच मैदानावर पोलिस खेळाडूंना पारितोषिके देण्याची संधी मिळाली. विशेष म्हणजे, ज्या गुरूंनी मला घडविले, त्यांनाच माझ्या हस्ते पारितोषिक देण्याचा सन्मान मिळाला, हा माझ्या आयुष्यातील अत्यंत आनंदाचा आणि अभिमानाचा क्षण आहे, अशा शब्दांत सिंधुदुर्गची ‘जलकन्या’ तथा राष्ट्रीय जलतरणपटू पूर्वा गावडे हिने आपल्या भावना व्यक्त केल्या.
तिच्या या आठवणींनी जिल्हा पोलिस क्रीडा स्पर्धांच्या समारोप सोहळ्याला भावनिक किनार लाभली. सिंधुदुर्ग जिल्हा पोलिस दलाच्या ३९ व्या जिल्हास्तरीय क्रीडा स्पर्धांचा समारोप आज सिंधुदुर्गनगरी येथील जिल्हा पोलिस परेड मैदानावर उत्साहात झाला. या कार्यक्रमात विशेष अतिथी म्हणून पूर्वा गावडे बोलत होती. यावेळी पोलिस अधीक्षक डॉ. मोहन दहिकर, प्रमुख पाहुणे शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. अमोल शिंदे, अपर पोलिस अधीक्षक नयोनी साटम, पोलिस उपअधीक्षक अमोल चव्हाण, पोलिस निरीक्षक प्रवीण कोल्हे, पोलिस निरीक्षक रामदास पालशेतकर यांच्यासह पोलिस अधिकारी, अंमलदार, निमंत्रित नागरिक आणि खेळाडू उपस्थित होते. यावेळी विविध क्रीडा प्रकारांतील विजेत्या पोलिस अधिकारी व अंमलदारांना मान्यवरांच्या हस्ते पारितोषिके देऊन गौरविण्यात आले. जिल्हा पोलिस मुख्यालय, कणकवली आणि सावंतवाडी विभागाच्या पथकांनी बँडच्या तालावर शिस्तबद्ध संचलन केले.
पूर्वा गावडे हिने पुढे बोलताना, ‘‘मी जलतरणाबरोबरच धावण्याचाही सराव करते. जलतरण प्रशिक्षकांप्रमाणेच पोलिस दलातील प्रदीप चव्हाण आणि कमलेश सोनवणे यांचे माझ्या क्रीडाप्रवासात मोलाचे योगदान आहे. त्यांनी मला धावण्याचे तंत्र शिकविले. त्यांच्या मार्गदर्शनामुळे मॉडर्न पेंटॅथलॉनच्या राष्ट्रीय स्पर्धेतही मला यश मिळविता आले. लहानपणी आई मला या मैदानावर सरावासाठी घेऊन यायची. तेव्हा पोलिस अधिकारी आणि पोलिस भरतीसाठी तयारी करणाऱ्या युवकांना पाहून मी प्रेरित व्हायचे. त्या आठवणी आजही ताज्या आहेत. आज त्याच मैदानावर प्रमुख अतिथी म्हणून बोलावून माझा सन्मान करण्यात आला. त्याबद्दल पोलिस दलाची मी आभारी आहे.’’, असे सांगितले.
यावेळी पोलिस अधीक्षक डॉ. मोहन दहिकर म्हणाले की, ‘‘ मैदानावरील विजय-पराभवापेक्षा खेळाची जिद्द, शिस्त आणि सांघिक भावना अधिक महत्त्वाची असते. त्यामुळे पोलिस अधिकारी व अंमलदारांनी मैदानावर जोपासलेली खिलाडूवृत्ती दैनंदिन कर्तव्यातही कायम ठेवावी.’’, असे सांगतानाच त्यांनी पूर्वाच्या क्रीडा कामगिरीचे कौतुक केले. लहानपणापासून राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय जलतरण स्पर्धांमध्ये सहभाग नोंदवून तिने उल्लेखनीय यश संपादन केले आहे. तिचा क्रीडाप्रवास पोलिस दलातील खेळाडूंसह त्यांच्या कुटुंबीयांसाठीही प्रेरणादायी आहे. पोलिस कुटुंबांतील मुलांनीही तिच्यापासून प्रेरणा घेऊन क्रीडाक्षेत्रात करिअर घडवावे, असे त्यांनी सांगितले.
शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. अमोल शिंदे यांनी, ‘‘पोलिस दलाशी माझा २००६ पासून जवळचा संबंध आहे. न्यायवैद्यकशास्त्रात पदव्युत्तर शिक्षण घेतल्यानंतर शवविच्छेदन, न्यायवैद्यकीय तपासणी आणि तज्ज्ञ अभिप्राय अशा आठ हजारांहून अधिक प्रकरणांच्या माध्यमातून पोलिस दलासोबत काम केले आहे. त्यामुळे पोलिस अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या दैनंदिन कर्तव्यातील आव्हानांची जाणीव आहे. अशा परिस्थितीत पूर्ण क्षमतेने काम करण्यासाठी शारीरिक आणि मानसिक स्वास्थ्य आवश्यक असून, त्यासाठी खेळ महत्त्वाची भूमिका बजावतात.’’ पोलिस दलाला वैद्यकीय मदत किंवा तज्ज्ञ सल्ल्याची आवश्यकता भासल्यास शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाची संपूर्ण टीम सहकार्यासाठी उपलब्ध राहील, अशी ग्वाही त्यांनी दिली.
अपर पोलिस अधीक्षक नयोनी साटम यांनी प्रास्ताविक करताना ‘‘पोलिस दल म्हटले की शिस्त, धैर्य, कर्तव्यदक्षता आणि कठोर परिश्रम करणारे अधिकारी व अंमलदार डोळ्यांसमोर येतात. मात्र, या खाकी वर्दीमागे एक उत्तम खेळाडू आणि विविध कलागुणांनी समृद्ध व्यक्तिमत्त्वही दडलेले असते. या सुप्त क्रीडागुणांना व्यासपीठ उपलब्ध करून देण्याचे महत्त्वपूर्ण काम पोलिस क्रीडा स्पर्धांमधून होते.’’
या स्पर्धांमध्ये व्हॉलीबॉल, बास्केटबॉल, हँडबॉल, खो-खो या सांघिक खेळांसह भालाफेक, गोळाफेक, थाळीफेक, १००, २०० आणि ४०० मीटर धावणे अशा विविध क्रीडा प्रकारांत पोलिस अधिकारी व अंमलदारांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला. जिल्हा पोलिस दलातील पोलिस हवालदार राहुल काळे, पोलिस शिपाई वैभव नार्वेकर आणि पोलिस शिपाई ओंकार पडवळ हे अखिल भारतीय पोलिस क्रीडा स्पर्धांमध्ये सिंधुदुर्ग जिल्ह्यासह कोकण परिक्षेत्राचे नाव उज्ज्वल करीत असल्याचे साटम यांनी सांगितले.
