Headlines

मालवण नळपाणी योजनेत सत्ताधारी-ठेकेदाराची मनमानी…

मंदार ओरसकर यांचा आरोप:जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार करणार..

⚡मालवण ता.३०-:
कोट्यावधी रुपये खर्च करून मालवण शहरात राबविण्यात येणाऱ्या नळपाणी योजनेचे सुरु असलेले निकृष्ट काम, टाक्यांच्या जागेत बदल आणि प्रशासनाच्या कारभारावर निशाणा साधत ठाकरे शिवसेनेचे नगरसेवक मंदार ओरसकर यांनी नळपाणी योजनेत सत्ताधारी-ठेकेदाराची मनमानी सुरु असल्याचा गंभीर आरोप केला तर या प्रकरणी जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार करणार असून, आवश्यकतेनुसार न्यायालयात दाद मागणार असल्याचा इशाराही त्यांनी दिला.

ठाकरे शिवसेनेच्या शिवसेना कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी तालुकाप्रमुख हरी खोबरेकर, नगरसेवक महेंद्र म्हाडगुत, तपस्वी मयेकर, नगरसेविका अनिता गिरकर यांच्यासह पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

ओरसकर म्हणाले, तत्कालीन आमदार वैभव नाईक यांच्या माध्यमातून शहराच्या पुढील ३० ते ४० वर्षांच्या पाण्याच्या गरजा लक्षात घेऊन ही योजना मंजूर करण्यात आली होती. मात्र, योजनेच्या कामाच्या दर्जाबाबत वारंवार आवाज उठवूनही विशेष सभा किंवा आढावा बैठक घेण्यात आलेली नाही. डीपीआरनुसार रेवतळे आणि राजकोट येथे प्रस्तावित असलेल्या पाण्याच्या टाक्यांच्या जागेत बदल करून त्या कुंभारमाठ येथे हलविण्याचे ठराव कोणतीही सविस्तर चर्चा न करता मंजूर करण्यात आल्याचा आरोप त्यांनी केला. तसेच पाइपलाइन खासगी जागांमधून टाकण्यात येत असल्याने भविष्यात देखभाल आणि दुरुस्तीचा प्रश्न निर्माण होणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
ठेकेदाराच्या सोयीसाठी तांत्रिक बाबींकडे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप करत, या संपूर्ण कामाची चौकशी करण्याची मागणी त्यांनी केली. सत्ताधारी बहुमताच्या जोरावर विरोधकांना विश्वासात न घेता निर्णय घेत असल्याचेही ते म्हणाले.

दरम्यान, नगरसेवक महेंद्र म्हाडगुत यांनी शहरातील रस्त्यांवरील अतिक्रमणे आणि अस्वच्छतेच्या प्रश्नावरून नगरपालिका प्रशासनाला धारेवर धरले. अतिक्रमणे हटविण्यासाठी उपोषणावेळी आठ दिवसांत कारवाईचे लेखी आश्वासन देण्यात आले होते. मात्र, दोन महिने उलटूनही कारवाई झालेली नाही. रस्ते रुंदीकरणासाठी आरक्षित जागा ताब्यात घेतलेली नसून, अनेक ठिकाणी अतिक्रमणे झाली आहेत. तसेच इमारतींमधील सांडपाणी उघड्यावर व गटारांमध्ये सोडले जात असल्याने नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न गंभीर बनला आहे, असे त्यांनी सांगितले.
मालवण शहर स्वच्छ, सुंदर आणि पर्यटनाच्या दृष्टीने सक्षम करण्यासाठी प्रशासनाने ठोस पावले उचलावीत. केवळ आश्वासने न देता अतिक्रमणांवर कारवाई करावी, अशी मागणी म्हाडगुत यांनी केली. शहराच्या विकासासाठी आणि नागरिकांच्या हक्कांसाठी सुरू असलेल्या लढ्याला नागरिकांनीही पाठिंबा द्यावा, असे आवाहन त्यांनी केले.

You cannot copy content of this page