⚡मालवण ता.१६-:
महाराष्ट्र शासनाच्या प्लास्टिक बंदी आदेशाची शहरात प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी मालवण नगरपरिषदेच्या वतीने काल धडक तपासणी मोहीम राबविण्यात आली. या मोहिमेदरम्यान बंदी असलेल्या प्लास्टिकचा वापर करणाऱ्या विक्रेत्यांवर दंडात्मक कारवाई करत प्लास्टिक साहित्य जप्त करण्यात आले आहे.
नगरपरिषदेच्या पथकाने कसाल-मालवण रोड परिसर, तसेच स्थानिक साप्ताहिक बाजारातील विविध किरकोळ विक्रेते, फेरीवाले आणि व्यावसायिक आस्थापनांची कसून तपासणी केली. या कारवाईदरम्यान काही विक्रेत्यांकडे शासनाने प्रतिबंधित केलेल्या ‘सिंगल युज प्लास्टिक’ वस्तू आणि प्लास्टिक पिशव्यांचा सर्रास वापर होत असल्याचे उघडकीस आले.
नियम धाब्यावर बसवून प्लास्टिकचा वापर करणाऱ्या संबंधित व्यावसायिकांवर नगरपरिषदेने नियमानुसार कडक दंडात्मक कारवाई केली. तसेच त्यांच्याकडे असलेला प्रतिबंधित प्लास्टिकचा साठा जागीच जप्त करण्यात आला. महाराष्ट्रात सिंगल युज प्लास्टिकवर पूर्णपणे बंदी असून, नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कडक दंडात्मक कारवाई व जप्तीची तरतूद असल्याचे प्रशासनाने पुन्हा एकदा स्पष्ट केले आहे.
मालवण शहरात प्लास्टिकमुळे होणारे प्रदूषण कमी करणे, शासनाच्या आदेशाची काटेकोर अंमलबजावणी करणे आणि नागरिक व व्यावसायिकांमध्ये पर्यावरणपूरक पर्यायांचा वापर वाढवणे हा या विशेष मोहिमेचा मुख्य हेतू आहे.
मालवण नगरपरिषदेने सर्व नागरिक, व्यापारी, दुकानदार आणि विक्रेत्यांना आवाहन केले आहे की, त्यांनी पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी प्लास्टिक पिशव्यांचा वापर पूर्णपणे थांबवावा. खरेदी व विक्रीसाठी कापडी, कागदी किंवा इतर पर्यावरणपूरक पर्यायांचा वापर करून मालवण शहर प्लास्टिकमुक्त करण्यासाठी सहकार्य करावे
