आमदार दीपक केसरकर यांच्या पाठपुराव्याला यश; वेंगुर्लेलाही मिळणार नवे मुख्याधिकारी..
सावंतवाडी : सावंतवाडी नगरपरिषदेचे गेल्या अनेक दिवसांपासून रिक्त असलेले मुख्याधिकारी पद अखेर भरण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. पुढील दोन दिवसांत नवीन मुख्याधिकाऱ्यांची नियुक्ती होऊन ते नगरपरिषदेत रुजू होतील, अशी माहिती आमदार दीपक केसरकर यांनी दिली.
सावंतवाडी नगरपरिषदेचा कारभार सध्या इतर अधिकाऱ्यांकडे अतिरिक्त कार्यभार देऊन चालविला जात होता. कायमस्वरूपी मुख्याधिकारी नसल्याने नागरिकांची गैरसोय होत होती, तसेच विविध विकासकामांना अडथळे निर्माण होत होते.
या पार्श्वभूमीवर आमदार दीपक केसरकर यांनी मुख्याधिकारी नियुक्तीसाठी शासन स्तरावर वारंवार पाठपुरावा केला होता. त्यांच्या प्रयत्नांना यश मिळाले असून लवकरच नगरपरिषदेला पूर्णवेळ मुख्याधिकारी मिळणार आहे.
दरम्यान, वेंगुर्ले नगरपरिषदेलाही नवीन मुख्याधिकारी मिळणार असून लवकरच संबंधित अधिकारी पदभार स्वीकारणार असल्याचे आमदार केसरकर यांनी सांगितले.
