विरोधकांनी रिफायनरी प्रकल्पासाठी समर्थन द्यावे

हा प्रकल्प होण्यासाठी आम्ही चर्चेला तयार;विकासकामांच्या उद्घाटन प्रसंगी मंत्री दीपक केसरकर यांचे आवाहन

⚡सावंतवाडी ता.१८-: वेदाता प्रकल्प राज्याबाहेर गेल्याने विरोध करणाऱ्या विरोधकांनी रत्नागिरी येथे होणाऱ्या रिफायनरी प्रकल्पाचे समर्थन करावे, त्यासाठी एकत्र बसून आम्ही चर्चा करण्यास तयार आहोत, असे आवाहन शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी सावंतवाडी येथील विकासकामांच्या उद्घाटन प्रसंगी केले आहे. या प्रकल्पातून २ लाखाहून जास्त नोकऱ्या उपलब्ध होणार आहेत असे देखील ते यावेळी म्हणाले आहेत.

यावेळी ते पुढे बोलताना म्हणाले की, तत्कालीन मुख्यमंत्र्यांनी विकासकामे केली नसल्याने विकासकामे अडकून पडली होती. परंतु, मंत्री असताना कधी मंत्रालयात न गेलेले आता आमच्यावर टीका करत सुटले असल्याचा आरोप देखील त्यांनी यावेळी विरोधकांवर केला आहे.

यावेळी शहरातील लाखे वस्तीत निर्माण झालेल्या सर्व समस्या लवकरात लवकर सोडविल्या जाणार आहेत. येथील नागरिकांना पाण्याचा प्रश्न गंभीररित्या उद्भवत असून, त्यांना विहीर मंजूर करून देण्यात आली आहे. पावसाळ्यानंतर त्याचे काम सुरू होणार आहे. अशी माहिती मंत्री केसरकर यांनी यावेळी दिली आहे. तसेच येथील युवकांसाठी जिम, आरोग्य केंद्र करून देण्यात येणार असून, घरे बांधून अनेक वर्ष झाल्याने अनेक घरात स्लॅब लिकेज झाल्याने गळत आहेत. तसेच ड्रेनेज समस्या आहेत. त्या देखील सोडविल्या जाणार आहेत. अशी माहिती त्यांनी यावेळी दिली.

यावेळी शहरातील ओम गणेश सोसायटीच्या मागच्या बाजूला ओपन जिम आणि खेळणी बसविण्याची उद्घाटन करण्यात आले. तसेच लाखे वस्तीतील अंतर्गत रस्ता, जिमखाना येथील बॅडमिंटन कोर्ट नव्याने करणे तसेच समाज मंदिर भागातील रस्त्यालगतच्या भागात प्लेव्हर ब्लॉक बसविण्याच्या कामाचे भूमिपूजन करण्यात आले.

You cannot copy content of this page