शिवरायांची युद्धनिती जागतिक औत्सुक्य

सतीश लळीत: सह्याद्री प्रतिष्ठानच्यावतीने कारगिल विजय दिन साजरा

⚡सिंधुदुर्गनगरी ता.०४-: शककर्ते छत्रपती शिवाजी महाराज यांची युद्धनीति आणि गनिमी काव्याचे तंत्र हा जगातील अनेक देशांच्या लष्करी अधिकाऱ्यांचा आणि युद्धतज्ञांच्या अभ्यासाचा, औत्सुक्याचा विषय आहे. साडेतिनशे वर्षांनंतरही ती कालबाह्य झालेली नाही, असे प्रतिपादन निवृत्त प्रशासकीय अधिकारी सतीश लळीत यांनी नुकतेच व्यक्त केले.

        सह्याद्री प्रतिष्ठानने सावरवाड येथील गुरुमाऊली हॉलमध्ये कारगिल विजय दिवस निमित्ताने आयोजित केलेल्या 'शौर्या तुला वंदितो' कार्यक्रमाच्या अध्यक्षपदावरुन ते बोलत होते. या कार्यक्रमात  ११ माजी सैनिकांचा सत्कार करण्यात आला. यावेळी कट्टा व वराड हायस्कुलच्या दहावी व बारावीमध्ये वैशिष्ट्यपुर्ण कामगिरी करणाऱ्या विद्यार्थी-विद्यार्थीनींनाही गौरविण्यात आले. १९९९ च्या युद्धात भारताने पाकिस्तानवर मिळवलेल्या विजयामुळे २६ जुलै हा कारगिल विजय दिवस म्हणुन साजरा केला जातो. त्याचे औचित्य साधुन सह्याद्री प्रतिष्ठान हिंदुस्थानच्या सिंधुदुर्ग विभागाद्वारे हा कार्यक्रम आयोजित केला होता. यावेळी डॉ सई लळीत, कट्टा पोलिस ठाण्याचे अधिकारी श्री. चव्हाण, राष्ट्रीय सेवा योजनेचे श्री. पराडकर, कट्टा हायस्कुलचे मुख्याध्यापक संजय नाईक, निरंजन आईर, कट्टा पंचक्रोशी शिक्षण मंडळाचे उपाध्यक्ष प्रशांत टेंबुलकर उपस्थित होते. सोहळ्याची सुरूवात छत्रपती शिवाजी महाराज आणि भारतमातेच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करुनआणि दीप प्रज्वलनाने झाली.

        सर्व माजी सैनिकांचा सत्कार शाल, श्रीफळ व स्मृतिचिन्ह देऊन करण्यात आला. 'घुंगुरकाठी, सिंधुदुर्ग' या संस्थेच्यावतीने सर्व सत्कारमुर्तींना आवळ्याचे रोप भेट देण्यात आले. कारगिल युद्ध, १९७१चे युद्ध, श्रीलंका शांतीसैन्य, सुवर्णमंदिर कारवाई, सुदानमधील यु.एन. मिशन अशा विविध युद्धमोहिमांमध्ये भाग घेतलेल्या पुढील माजी सैनिकांचा यावेळी सत्कार करण्यात आला. हवालदार सतीश मडव (जांभवडे), सुभेदार सदानंद गवस (उपवडे), सुभेदार राजेंद्र नाईक (उपवडे), सुभेदार सुभाष कदम (सावंतवाडी), ऋषिदास धुरी (बांदा), नायब सुभेदार श्यामसुंदर सावंत (पणदुर), हवालदार प्रभाकर पवार (डिगस), हवालदार अनिल नाईक (नेरुरपार), हवालदार वामन परब (अणाव), सुभेदार मेजर ऑनररी कॅप्टन व्हिक्टर पिंटो (कडावल). माजी सैनिक सुनील नाईक यांच्यावतीने त्यांचे बंधु काशीनाथ नाईक यांनी सत्कार स्वीकारला.  

        'छत्रपती शिवरायांची युद्धनीति' या विषयावर बोलताना श्री. सतीश लळीत पुढे म्हणाले की, चारही बाजुंनी मोंगल, आदिलशाही, कुतुबशाही, निजामशाही, इंग्रज, पोर्तुगिज, डच, फ्रेंच, सिद्दी असे मातब्बर शत्रु थयथया नाचत असताना शिवरायांनी अत्यंत प्रतिकुल परिस्थितीत स्वराज्याची उभारणी केली. या शत्रुंशी लढण्यासाठी त्यांनी स्वत:ची अशी गनिमी काव्याचा समावेश असलेली युद्धनीति तयार केली. या शत्रुंशी लढताना पारंपरिक युद्ध करुन चालणार नाही, हे ओळखुन त्यांनी मैदानी युद्धे नेहमी टाळली आणि शत्रुला आपल्या सैन्याच्यादृष्टीने सोयीच्या व सवयीच्या डोंगराळ प्रदेशात ओढून आणुन पराभूत केले. मोठ्या सैन्याचे मंद हालचाल, प्रचंड खर्च, सरंजाम, नियंत्रणासाठी कठीण असे तोटेओळखुन त्यांनी आपले सैन्य छोटे, पण प्रभावी ठेवले. उत्तम संघटन, शत्रुचे मानसशास्त्र ओळखण्याची कला, मावळ्यांप्रती असलेला आपलेपणा ही त्यांच्या युद्धनितीची वैशिष्ट्ये होती. त्यांनी जलदुर्ग, डोंगरी किल्ले, भुईकोट यांचे जाळे निर्माण केले. शत्रुच्या गोटातील बित्तंबातमी आणणाऱ्या कुशल, बुद्धीमान, विश्वासु माणसांचे अचंबित करणारे हेरखाते शिवरायांनी निर्माण केले. समुद्राचे महत्व ओळखुन स्वतंत्र आरमाराची उभारणी करणारे छत्रपती हे भारतातील पहिले राज्यकर्ते होते. त्यांच्या या युद्धनितीचा आजही जगभरात अभ्यास आणि वापर होतो.

        यावेळी माजी सैनिकांनी सत्काराबद्दल आभार व्यक्त केले. डॉ. सई लळीत, हेमंत परब, यशवंत भालेकर, संजय नाईक यांनीही मनोगत व्यक्त केले. कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी सह्याद्री प्रतिष्ठानच्या सिंधुदुर्ग शाखेचे अध्यक्ष सुनील राऊळ, विनोद पाटील, विठ्ठल शेट्ये, एकनाथ गुरव, हितेश कोयंडे यांच्यासह अनेक दुर्गसेवक व दुर्गसेविकांनी परिश्रम घेतले. आभाळमाया ग्रुप, फोंडाचे सदस्य, युवक कला क्रीडा मंडळाचे सदस्य यावेळी उपस्थित होते. श्री. हेमंत परब यांनी विशेष सहकार्य केले. दुर्गसेवक सिद्धेश परब यांनी सूत्रसंचालन केले.

You cannot copy content of this page