मालवण दि प्रतिनिधी
“वंदे मातरम्!”, “भारत माता की जय!”, “जय जवान, जय किसान!”, “भारतीय स्वातंत्र्यदिन चिरायू होवो!” अशा आसमंत दणाणून सोडणाऱ्या देशभक्तीपर घोषणांनी कट्टा परिसर देशभक्तीच्या उत्साहाने भारावून गेला. भारताच्या ८०व्या स्वातंत्र्यदिनाच्या पार्श्वभूमीवर शासनाच्या ‘हर घर तिरंगा’ अभियानांतर्गत वराडकर हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय, कट्टा येथील विद्यार्थ्यांनी प्रभात फेरी काढली.
कट्टा येथील वराडकर हायस्कूल येथून प्रभात फेरीला सुरुवात झाली. कट्टा बाजारपेठ, समादेवी मंदिर मार्गे ही फेरी वरची गुरामवाडी ग्रामपंचायतीजवळ पोहोचली. यावेळी विद्यार्थ्यांनी तिरंग्याला सलामी देत राष्ट्रध्वजाप्रती आदर व्यक्त केला. विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या समूहगीताने वातावरण देशभक्तीमय झाले, तर लेझीम पथकाने सादर केलेल्या आकर्षक नृत्याने उपस्थितांची दाद मिळवली.
प्रभात फेरीदरम्यान स्काऊट-गाईड आणि एनसीसीच्या विद्यार्थ्यांनी शिस्तबद्ध संचलन केले. विद्यार्थ्यांच्या घोषणांमुळे संपूर्ण कट्टा परिसर दुमदुमून गेला. प्रभात फेरी पुन्हा प्रशालेत येऊन सांगता करण्यात आली.
यावेळी गटशिक्षणाधिकारी संजय माने, वरची गुरामवाडीच्या सरपंच शेखर पेणकर, कट्टा पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळाच्या स्कूल कमिटीचे अध्यक्ष सुधीर वराडकर, मुख्याध्यापिका सौ देवयानी गावडे यांच्यासह प्रशालेतील शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी उपस्थित होते.
