Headlines

कणकवलीत १.७९८ किलो गांजासह दोघे ताब्यात…

स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेची कारवाई:१ लाख ८० हजारांचा मुद्देमाल जप्त..

कणकवली : गांजाची खरेदी-विक्री करण्यासाठी आलेल्या दोघांना स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने सापळा रचून ताब्यात घेतले. त्यांच्याकडून १.७९८ किलो गांजा तसेच दोन दुचाकी असा एकूण १ लाख ८० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. ताब्यात घेण्यात आलेल्यांमध्ये एका विधिसंघर्षग्रस्त बालकाचा समावेश आहे.

कणकवली पोलीस ठाणे हद्दीतील गांगो मंदिर ते गणपती साना जाणाऱ्या डांबरी रस्त्यालगत टेंबवाडी येथील आम्रपाली सोसायटीजवळ काही इसम गांजाची विक्री करण्यासाठी येणार असल्याची गोपनीय माहिती स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेला मिळाली होती. त्यानुसार दोन पंच तसेच प्रमाणित वजनकाटा धारकाला सोबत घेऊन कारवाई करण्यात आली.

स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने सापळा रचून सूर्यकांत राघो घाडीगावकर (वय २९, रा. वागदे देऊळवाडी, ता. कणकवली) आणि एका विधिसंघर्षग्रस्त बालकाला मोपेड व मोटारसायकलसह ताब्यात घेतले. त्यांची झडती घेतली असता दोन पारदर्शक प्लास्टिक पिशव्यांमध्ये हिरवट रंगाचा उग्र वास येणारा गांजा आढळून आला. वजन केल्यानंतर प्लास्टिक पिशव्यांसह गांजाचे वजन १.७९८ किलो असल्याचे निष्पन्न झाले. त्याची किंमत ६० हजार रुपये आहे. यावेळी ८० हजार रुपये किमतीची आकाशी रंगाची यमाहा फॅसिनो दुचाकी (एमएच ०७ ए.क्यू. ४०८८) आणि ४० हजार रुपये किमतीची काळ्या रंगाची हिरो स्प्लेंडर दुचाकी (केए ३२ एच.एच. १२१४) जप्त करण्यात आली.

ही कारवाई गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक प्रवीण कोल्हे, पोलीस उपनिरीक्षक अनिल हाडळ, एएसआय डॉमिनिक डिसोझा, पोलीस हेड कॉन्स्टेबल राजेंद्र गोसावी, विल्सन डिसोझा, आशिष जामदार, जॅक्सन घोन्सालवीस तसेच पोलीस कॉन्स्टेबल श्री. समजिस्कर व श्री. कांडर यांच्या पथकाने केली.

You cannot copy content of this page