आरोग्य जनजागृतीसोबतच महिला सक्षमीकरणासाठी अगरबत्ती निर्मिती मशीनचा शुभारंभ..

⚡सावंतवाडी ता.२९-: सुंदरवाडी महिला स्तर संघ उद्योग केंद्राच्या वतीने महिला बचत गटातील सदस्य तसेच नागरिकांसाठी नेत्र तपासणी व आरोग्य मार्गदर्शन शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिराला प्रयोगशाळा तज्ज्ञ ओमकार ठाकूर, सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयाचे पोटविकार तज्ज्ञ तथा जनरल सर्जन डॉ. रुपेशकुमार झा, महिला बचत गटाच्या पदाधिकारी, नगरसेवक, नगरसेविका व मान्यवर उपस्थित होते. यावेळी उपस्थित मान्यवरांचे पुष्पगुच्छ व रोप देऊन स्वागत करण्यात आले.
याप्रसंगी नगरसेविका स्नेहा नाईक यांनी मनोगत व्यक्त करताना, सावंतवाडी शहरातील विविध प्रभागांमध्ये नगरपालिकेच्या माध्यमातून आरोग्य शिबिरांचे आयोजन करण्यात येणार असल्याचे सांगितले. नागरिक आणि महिला बचत गटातील सदस्यांसह त्यांच्या कुटुंबीयांचे आरोग्य चांगले राहावे, तसेच आरोग्यविषयक सुविधांची माहिती मिळावी, या उद्देशाने अशा शिबिरांचे आयोजन केले जात आहे. यासाठी सर्वांनी सहकार्य करावे, असे आवाहन त्यांनी केले.
