Headlines

निगुडेतील कथित अनधिकृत दुकान गाळ्यांवर कारवाईची मागणी

३० नोव्हेंबरला पंचायत समितीसमोर लाक्षणिक उपोषणाचा इशारा

बांदा ता.२९-:
निगुडे येथील कथित अनधिकृत दुकान गाळ्यांवर ग्रामपंचायतीने नोटीस बजावूनही अद्याप ठोस कारवाई न झाल्याने संबंधित गाळ्यांवर तातडीने कायदेशीर कारवाई करावी, तसेच संपूर्ण प्रकरणाची वरिष्ठ अधिकाऱ्यांमार्फत चौकशी करावी, अशी मागणी भाग्यलक्ष्मी गोपाळ मोरजकर यांनी केली आहे. या मागण्यांकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी सोमवार दिनांक ३० नोव्हेंबर रोजी पंचायत समिती सावंतवाडी कार्यालयासमोर लाक्षणिक उपोषण करण्यात येणार असल्याची पूर्वसूचना त्यांनी गटविकास अधिकाऱ्यांना लेखी दिली आहे.
निगुडे येथील संबंधित दुकान गाळ्यांच्या बांधकामाला ग्रामपंचायतीची अधिकृत परवानगी आहे का, तसेच व्यवसायासाठी आवश्यक ना हरकत दाखला घेण्यात आला आहे का, याबाबत ग्रामस्थांनी यापूर्वी ग्रामपंचायतीकडे लेखी तक्रारी केल्या होत्या. ५ ऑक्टोबर रोजी झालेल्या विशेष ग्रामसभेतही या गाळ्यांबाबत कायदेशीर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली होती. त्यानुसार ग्रामसभेत ठराव घेण्यात आला होता.
ग्रामपंचायत निगुडेने ५ नोव्हेंबर रोजी जा.क्र. १७९/२०२६ अन्वये संबंधित गाळेधारकांना नोटीस बजावली होती. या नोटिशीत संबंधित दुकान गाळ्यांच्या बांधकामासाठी ग्रामपंचायतीची अधिकृत परवानगी घेतल्याचे आढळून आले नसल्याचे नमूद करण्यात आले आहे. तसेच व्यवसायासाठी आवश्यक ना हरकत दाखला घेतल्याचेही आढळून आले नसल्याचे स्पष्ट केले आहे.
महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम १९५९ मधील कलम ५२(४) अंतर्गत कारवाईचा निर्णय घेतल्याचे नमूद करून संबंधितांना नोटीस मिळाल्यापासून १५ दिवसांच्या आत दुकान गाळे पाडून टाकण्याचे निर्देश देण्यात आले होते. मात्र, मुदत संपूनही प्रत्यक्ष कारवाई झालेली नसल्याचा दावा निवेदनात करण्यात आला आहे.
वरिष्ठस्तरीय चौकशीची मागणी
संबंधित दुकान गाळ्यांचे बांधकाम, त्यांना देण्यात आलेले असेसमेंट आणि व्यवसायासाठी आवश्यक परवानग्यांची तपासणी करावी, अशी मागणी मोरजकर यांनी केली आहे. तसेच ग्रामसभेतील ठरावाची अंमलबजावणी का झाली नाही आणि नोटिशीनंतरही कारवाई का करण्यात आली नाही, याबाबत संबंधित अधिकाऱ्यांकडून लेखी खुलासा मागवावा, असे निवेदनात म्हटले आहे.
संबंधित जागेची प्रत्यक्ष स्थळपाहणी करून मूळ अभिलेखांच्या आधारे बांधकामाची वैधता तपासावी. या प्रकरणात कोणत्याही स्तरावर दिरंगाई किंवा हलगर्जीपणा झाला असल्यास संबंधितांची जबाबदारी निश्चित करून नियमानुसार कारवाई करावी, अशी मागणीही करण्यात आली आहे.
ग्रामपंचायत स्तरावर वारंवार पाठपुरावा करूनही ठोस कार्यवाही होत नसल्याने लोकशाही मार्गाने लाक्षणिक उपोषण करण्याचा निर्णय घेतल्याचे निवेदनात नमूद केले आहे. उपोषणापूर्वी प्रकरणाची चौकशी करून कायदेशीर कार्यवाही सुरू करावी, तसेच उपोषणाच्या दिवशी सक्षम अधिकारी उपस्थित ठेवून मागण्यांबाबत लेखी कार्यवाहीची दिशा आणि कालमर्यादा निश्चित करावी, अशी मागणी करण्यात आली आहे.
या निवेदनाच्या प्रती जिल्हाधिकारी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, उपमुख्य कार्यकारी अधिकारी (ग्रामपंचायत) आणि ग्रामपंचायत निगुडे यांना पाठविण्यात आल्या आहेत.

You cannot copy content of this page