Headlines

कणकवलीत उद्या ‘एक दिवस छोट्यांचा – खाऊगल्ली’चा धमाका!

पालकमंत्री नितेश राणे यांच्या हस्ते होणार उद्घाटन

कणकवली : बच्चे कंपनीसाठी धमाल, मस्ती आणि मनोरंजनाची अनोखी पर्वणी घेऊन समीर नलावडे आणि मित्रमंडळाचा ‘एक दिवस छोट्यांचा – खाऊगल्ली’ हा विशेष उपक्रम उद्या, रविवार २९ नोव्हेंबर रोजी कणकवलीतील गणपती साना येथे रंगणार आहे. सायंकाळी ५.३० ते रात्री ११ वाजेपर्यंत आयोजित या कार्यक्रमाचे उद्घाटन राज्याचे मत्स्यव्यवसाय व बंदरे विकास मंत्री तथा सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री ना. नितेश राणे यांच्या हस्ते होणार आहे.

गेली आठ वर्षे समीर नलावडे आणि मित्रमंडळाच्या वतीने या उपक्रमाचे आयोजन करण्यात येत आहे. मुलांना आनंदाचे क्षण अनुभवता यावेत, त्यांच्या कलागुणांना वाव मिळावा आणि एक दिवस मनसोक्त मजा-मस्ती करता यावी, या उद्देशाने यंदाही विविध मनोरंजनात्मक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

कार्यक्रमाच्या शुभारंभी मुलांना चॉकलेटचे वाटप करण्यात येणार असून, काही चॉकलेटमध्ये लकी ड्रॉची बक्षिसे असणार आहेत. मुंबईहून येणाऱ्या जादूगाराचे खास जादूचे प्रयोग, हिंदी व मराठी गीतांचा ऑर्केस्ट्रा तसेच मुलांसाठी प्रश्नमंजुषा हे कार्यक्रमाचे विशेष आकर्षण असणार आहे. प्रश्नमंजुषेत योग्य उत्तरे देणाऱ्या मुलांना आकर्षक बक्षिसे दिली जाणार आहेत.

खाऊगल्लीमध्ये सहभागी होणाऱ्या पहिल्या एक हजार मुलांना प्रत्येकी ५० रुपयांचे मोफत कुपन देण्यात येणार आहे. या कुपनच्या माध्यमातून मुलांना खाऊगल्लीत उभारण्यात आलेल्या स्टॉलवर आपल्या आवडीचे खाद्यपदार्थ खरेदी करून त्याचा आस्वाद घेता येणार आहे.

या उपक्रमात महिला बचत गट आणि व्यापाऱ्यांना मोफत स्टॉल उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. स्टॉलधारकांना टेबल, खुर्ची आणि वीज व्यवस्था पुरविण्यात येणार असून, कोणतेही शुल्क आकारले जाणार नाही. प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य या तत्त्वावर स्टॉलचे वाटप करण्यात येणार आहे.

कार्यक्रमस्थळी विविध कार्टून्स, आकर्षक सेल्फी पॉईंट, आकाशपाळणा, मोठे झोपाळे यांसह जत्रोत्सवाप्रमाणे विविध मनोरंजनात्मक खेळांची व्यवस्था करण्यात आली आहे. तसेच मुलांच्या हातावर मोफत तात्पुरते टॅटू काढण्यासाठी दोन व्यक्ती उपलब्ध असणार आहेत.

या उपक्रमाच्या प्रमोशनसाठी बच्चेकंपनीने खाऊगल्लीसंदर्भात रिल्स तयार करून सोशल मीडियावर अपलोड कराव्यात, असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे. रविवारच्या सुट्टीच्या दिवशी बच्चेकंपनीला आनंदाची पर्वणी अनुभवता यावी, यासाठी समीर नलावडे आणि मित्रमंडळाने विशेष नियोजन केले आहे.

You cannot copy content of this page