तीन महत्त्वाच्या ठिकाणी सीसीटीव्ही…
⚡बांदा ता.२९-: मुंबई-गोवा महामार्गावरून पै-काणे कंपनीकडे जाणाऱ्या वर्दळीच्या रस्त्यावर दर्जेदार प्रकाशव्यवस्था उभारण्यासह तीन महत्त्वाच्या ठिकाणी वाय-फाय सक्षम सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात येणार आहेत. याबाबत लोकप्रतिनिधी व सामाजिक कार्यकर्त्यांनी केलेल्या मागणीला पै-काणे कंपनीने सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. कंपनीचे संचालन उपाध्यक्ष दीपक सोनवणे यांनी मागणी केलेली कामे पूर्ण करून देण्याचे आश्वासन दिले.
मुंबई-गोवा महामार्गापासून पै-काणे कंपनीकडे जाणाऱ्या रस्त्याचे काँक्रिटीकरण झाल्यानंतर या मार्गावरील वाहतुकीत मोठी वाढ झाली आहे. कोल्हापूर, बेळगाव, पुणे, नागपूर, सोलापूर आदी शहरांतून येणाऱ्या अवजड वाहनांसह पर्यटकांच्या वाहनांची या मार्गावरून नियमित ये-जा सुरू असते. मात्र, सायंकाळनंतर अपुरी प्रकाशव्यवस्था असल्याने स्थानिक नागरिक, दुचाकीस्वार आणि वाहनचालकांना अंधाराचा सामना करावा लागतो. रस्त्यावर अचानक येणारी गुरे-जनावरे अंधारात दिसत नसल्याने अपघातांचा धोका वाढला आहे.
या पार्श्वभूमीवर ग्रामपंचायत सदस्य प्रशांत बांदेकर, विशेष कार्यकारी अधिकारी हेमंत दाभोलकर आणि सामाजिक कार्यकर्ते गुरु कल्याणकर यांनी पै-काणे कंपनीची भेट घेतली. यावेळी कंपनीचे संचालन उपाध्यक्ष दीपक सोनवणे यांच्याशी चर्चा करून त्यांना निवेदन सादर करण्यात आले.
महामार्गापासून कंपनीपर्यंतच्या संपूर्ण रस्त्यावर उच्च दर्जाची प्रकाशव्यवस्था उभारावी, तसेच गडगेवाडी रस्ता, निमजगा आणि गवळीटेंब तिठा या तीन महत्त्वाच्या ठिकाणी वाय-फाय सक्षम सीसीटीव्ही कॅमेरे बसवावेत, अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली. याशिवाय कॅमेऱ्यांची नियमित देखभाल व निरीक्षण करण्यासह आवश्यक ठिकाणी नामफलक आणि दिशादर्शक फलक बसविण्याबाबतही लक्ष वेधण्यात आले.
नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न लक्षात घेऊन सोनवणे यांनी या मागण्यांना सकारात्मक प्रतिसाद दिला. मागणी केलेली कामे पूर्ण करून देण्याचे आश्वासन त्यांनी दिले.
कंपनीच्या या सकारात्मक भूमिकेमुळे स्थानिक नागरिकांमध्ये समाधान व्यक्त होत आहे. या कामांची लवकरात लवकर प्रत्यक्ष अंमलबजावणी होऊन रस्त्यावरील वाहतूक अधिक सुरक्षित होईल, अशी अपेक्षा नागरिकांकडून व्यक्त करण्यात येत आहे.
फोटो:-
बांदा येथे कंपनीच्या अधिकाऱ्यांना निवेदन देताना प्रशांत बांदेकर, हेमंत दाभोलकर व गुरु कल्याणकर.

