बंडू हर्णे:सभागृहाच्या कामाची चौकशी, स्ट्रक्चरल ऑडिट करण्याची मागणी,अंदाजपत्रक, एमबी रेकॉर्ड आणि बिलांचे पुरावे जनतेसमोर आणणार..

⚡कणकवली ता.२८-: सत्तेवर येण्यापूर्वी आणि सत्तेवर आल्यानंतरही कणकवलीकरांना भ्रष्टाचारमुक्त कणकवली आणि शाश्वत विकासाचे आश्वासन देणाऱ्या सत्ताधाऱ्यांच्या कारभाराचे वास्तव पहिल्याच विकासकामातून समोर आले आहे. पालकमंत्री नितेश राणे यांच्या माध्यमातून आणि आमच्या प्रयत्नांतून शहरातील विकासकामांसाठी निधी उपलब्ध झाला. मात्र, त्या निधीतून झालेल्या कामांचा दर्जा काय आहे, हे नगरपंचायतीच्या नूतनीकरण केलेल्या सभागृहातील प्रकारावरून स्पष्ट झाले आहे. या कामांमधील कथित भ्रष्टाचाराचा पर्दाफाश आम्ही पुराव्यानिशी करणार आहोत.मला निलंबित करण्यासाठी नगराध्यक्षांना 10 जन्म घ्यावे लागतील ,असा इशारा विरोधी नगरसेवकांच्यावतीने माजी उपनगराध्यक्ष बंडू हर्णे यांनी दिला.
कणकवली येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते, यावेळी नगरसेवक संजय कामतेकर, मेघा गांगण,मेघा सावंत , मनस्वी ठाणेकर, प्रतीक्षा सावंत, आर्या राणे आदी नगरसेवक उपस्थित होते.
सत्ताधाऱ्यांना सत्तेवर येऊन अकरा महिने पूर्ण होत आहेत. येत्या २१ तारखेला त्यांच्या सत्तेच्या वर्षपूर्तीचा टप्पा पूर्ण होणार आहे. वर्षपूर्तीच्या पार्श्वभूमीवर नगरपंचायतीच्या सभागृहाचे मोठ्या थाटामाटात उद्घाटन करण्यात आले. अनेकांचा सत्कारही करण्यात आला. मात्र, उद्घाटनाच्या दिवशीच सभेच्या शेवटी एका महिलेच्या पदराचा किंवा ओढणीचा किरकोळ स्पर्श होताच सभागृहातील कामाचा भाग पत्त्याच्या बंगल्याप्रमाणे कोसळल्याचा प्रकार घडला. पहिल्याच कामाची ही अवस्था असेल तर पुढील कामांच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे. आमच्या गटनेत्या डॉ. सुप्रिया नलावडे यांनी चार महिन्यांपूर्वीच या सर्व कामांची अंदाजपत्रके मागितली होती. मात्र, प्रशासनाकडून अद्याप ती उपलब्ध करून देण्यात आलेली नाहीत. आता सोमवार आणि मंगळवारी संबंधित कामांची अंदाजपत्रके, एमबी रेकॉर्ड (मोजमाप पुस्तिका) तसेच बिल अदा केल्याचे पुरावे मागविण्यात येणार आहेत. ही कागदपत्रे प्राप्त झाल्यानंतर पत्रकारांना सोबत घेऊन प्रत्यक्ष कामांची पाहणी करण्यात येईल. सभागृहातील अॅकॉस्टिक काम, जुने फर्निचर नव्याने केल्याचे दाखविण्यात आले आहे का, पीव्हीसी सीट, झुंबर आणि इतर अनुषंगिक कामांमध्ये नेमका किती खर्च झाला, याची माहिती पुराव्यांसह जनतेसमोर आणणार असल्याचा इशारा बंडू हर्णे यांनी दिला आहे.
पेव्हर ब्लॉकच्या कामामध्ये आठ इंच सोलिंग आणि चार इंच पीसीसी केल्याचे अंदाजपत्रकात नमूद आहे. प्रत्यक्षात किती काम झाले आणि किती कामाचे बिल अदा करण्यात आले, याची तपासणी करण्यासाठी पत्रकारांच्या उपस्थितीत ट्रायल पिट घेण्यात येणार आहे. सोलिंगची जाडी किती आहे, पीसीसीची जाडी किती आहे आणि त्यानुसार प्रत्यक्ष काम झाले आहे का, हे सर्वांसमक्ष दाखविण्यात येईल. त्यातून कामातील अनियमितता स्पष्ट होईल. मला निलंबित करण्याची भाषा केली जात आहे. मात्र, नगराध्यक्षांना राज्य शासनाने कोणते अधिकार दिले आहेत, याची माहिती त्यांनी आधी करून घ्यावी. मला निलंबित करण्यासाठी नगराध्यक्षांना दहा जन्म घ्यावे लागतील, असा टोला बंडू हर्णे यांनी लगावला. केवळ राजकीय दबावातून निलंबनाच्या धमक्या देण्याऐवजी विकासकामांचा दर्जा आणि त्यातील त्रुटींवर उत्तर द्यावे, असेही त्यांनी सुनावले.
सभागृहाचे काम कोसळण्याच्या घटनेला संबंधित आर्किटेक्ट, इंजिनिअर, ठेकेदार आणि कामाची मोजमापे नोंदविणारे अधिकारी जबाबदार असतील, तर त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे. या प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कारवाई करण्याची मागणी सोमवारी किंवा मंगळवारी निवेदनाद्वारे करण्यात येणार आहे. सभागृहाचे स्ट्रक्चरल ऑडिट होईपर्यंत या ठिकाणी कामकाज करणे धोकादायक ठरू शकते. अन्यथा सभागृहात नागरिकांचे प्रश्न मांडताना नगरसेवकांवरच जीव धोक्यात घालण्याची वेळ येईल.नगरपंचायतीच्या पहिल्याच सभेतील पहिल्या ठरावापासून आम्ही विकासकामे अडवू नका, अशी भूमिका घेतली होती. पालकमंत्री नितेश राणे यांनी कणकवलीकरांना सोयीसुविधा मिळाव्यात यासाठी निधी मंजूर केला होता. मात्र, नगराध्यक्षांच्या वैयक्तिक भूमिकेमुळे काही ठेकेदारांना कामे द्यायची नाहीत, अशी भूमिका घेण्यात आली. त्यामुळे विकासकामांची प्रक्रिया लांबली. न्यायालयीन प्रक्रियेमुळे कामांना विलंब झाला. या काळात बांधकाम साहित्याचे दर वाढले तर त्याचा अतिरिक्त आर्थिक भार नगरपंचायतीवर पडू शकतो. त्याची जबाबदारी नेमकी कोण घेणार, असा सवाल बंडू हर्णे यांनी केला. नगराध्यक्षांनी सुरुवातीलाच एक पाऊल मागे घेतले असते, तर शहरातील नागरिक विकासकामांपासून वंचित राहिले नसते आणि नगरपंचायतीचे आर्थिक नुकसानही टळले असते. पालकमंत्र्यांच्या माध्यमातून आलेल्या निधीतील कामे वेळेत पूर्ण होणे आवश्यक होते. मात्र, सत्ताधाऱ्यांच्या भूमिकेमुळे शहराच्या विकासाला खीळ बसला आहे.
आमच्या काळातील भ्रष्टाचाराचीही चौकशी करा!
मागील सत्ताकाळात भ्रष्टाचार झाल्याचे आरोप सध्याच्या सत्ताधाऱ्यांनी केले होते. त्यावेळी केलेल्या आरोपांची चौकशी लावा, अशी मागणी आम्ही स्वतः दोन वेळा सभागृहात केली आहे. आता सत्ता तुमच्या हातात आहे. आमच्या काळातील कामांची चौकशी करा आणि गैरव्यवहार आढळल्यास कारवाई करा. मात्र, त्याचवेळी तुमच्या काळातील कामांचीही चौकशी झाली पाहिजे. आमच्या काळातील रस्त्यांच्या कामांचा दर्जा तपासा. पाच वर्षांनंतरही रस्त्यांवर खड्डे पडले आहेत का, याची प्रत्यक्ष पाहणी करा. आम्ही कोणत्याही चौकशीला सामोरे जाण्यास तयार आहोत, असे आव्हान बंडू हर्णे यांनी दिले.
