Headlines

मोबाईलच्या आभासी दुनियेतून बाहेर पडून मैदानाकडे वळा…

दिव्य ज्योती प्रशालेच्या क्रीडा महोत्सवात फादर जोबी यांचे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन..

⚡बांदा ता.२८-: डेगवे येथील दिव्य ज्योती प्रशालेचा वार्षिक क्रीडा महोत्सव २७ व २८ नोव्हेंबर रोजी उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. मोबाईल आणि रील्सच्या आभासी दुनियेत वेळ वाया न घालवता मैदानी खेळांकडे वळा, खेळा, व्यायाम करा आणि निरोगी राहा, असा मोलाचा संदेश प्रमुख पाहुणे फादर जोबी कुरियन यांनी विद्यार्थ्यांना दिला.
क्रीडा महोत्सवाचे उद्घाटन फादर जोबी कुरियन यांच्या हस्ते क्रीडा मशालीचे प्रज्वलन व श्रीफळ वाढवून करण्यात आले. यावेळी प्रशालेचे व्यवस्थापक फादर लिजो, शिक्षकवृंद आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. फादर जोबी कुरियन हे सध्या आंबेरी येथील चेरिश निर्मलगिरी संस्थेचे संचालक म्हणून कार्यरत आहेत. विशेष गरजा असलेल्या तसेच बौद्धिक दिव्यांगत्व असलेल्या प्रौढ व्यक्तींचे निवास, संगोपन, काळजी आणि सर्वांगीण कल्याणासाठी ही संस्था कार्यरत आहे.
उद्घाटनप्रसंगी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना फादर जोबी म्हणाले, “मोबाईल आणि रील्सच्या दुनियेत आपला मौल्यवान वेळ वाया घालवू नका. या आभासी दुनियेतून बाहेर पडून मैदानी खेळांकडे वळा. खेळा, व्यायाम करा आणि निरोगी व तंदुरुस्त राहा. खेळांमध्ये नेहमी निकोप स्पर्धा करा.”
युवा क्रिकेटपटू वैभव सूर्यवंशी याचे उदाहरण देत त्यांनी एकाग्रतेचे महत्त्व स्पष्ट केले. कमी वयात क्रिकेटमध्ये उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या सूर्यवंशीच्या यशामागे असलेली एकाग्रता, सातत्यपूर्ण सराव आणि खेळाप्रती समर्पण विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी असल्याचे त्यांनी सांगितले. कोणत्याही क्षेत्रात यश मिळवायचे असेल, तर ध्येय निश्चित करून पूर्ण एकाग्रतेने प्रयत्न करणे आवश्यक आहे, असेही त्यांनी नमूद केले.
खेळामुळे विद्यार्थ्यांचा शारीरिक आणि मानसिक विकास होतो. खेळातून शिस्त, संघभावना, नेतृत्वगुण, आत्मविश्वास, सहकार्य आणि खिलाडूवृत्ती विकसित होते. विजय मिळविणे जितके महत्त्वाचे आहे, तितकेच पराभव खिलाडूवृत्तीने स्वीकारणेही आवश्यक आहे, असे त्यांनी सांगितले.
या महोत्सवात कबड्डी, क्रिकेट, डॉजबॉल, लंगडी, व्हॉलीबॉल आणि रिले शर्यतींसह विविध सांघिक खेळांचे आयोजन करण्यात आले होते. वैयक्तिक क्रीडा प्रकारांमध्ये गोळाफेक, थाळीफेक, भालाफेक, लांब उडी, उंच उडी तसेच २०, १०० आणि ४०० मीटर धावण्याच्या स्पर्धांचा समावेश होता.
विद्यार्थ्यांनी सर्व स्पर्धांमध्ये उत्स्फूर्त सहभाग घेत आपल्या क्रीडानैपुण्याचे, जिद्दीचे आणि खिलाडूवृत्तीचे दर्शन घडविले. चुरशीच्या लढती, खेळाडूंचा उत्साह आणि सहकाऱ्यांचा जल्लोष यामुळे संपूर्ण शालेय परिसर क्रीडामय झाला होता.
विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासात खेळाचे महत्त्व अधोरेखित करणारा हा वार्षिक क्रीडा महोत्सव आनंददायी आणि उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला.
फोटो:-
डेगवे येथे दिव्य ज्योती प्रशालेत क्रीडा महोत्सवाचे क्रीडा ज्योत प्रज्वलीत करून उदघाटन करताना मान्यवर.

You cannot copy content of this page