Headlines

श्री क्षेत्र बिडवाडीत पाच दिवसीय भव्य कीर्तन महोत्सवाचे आयोजन!

नामवंत कीर्तनकारांच्या वाणीतून रंगणार संतचरित्रांचा भक्तिमय जागर; भाविकांना मिळणार अध्यात्मिक पर्वणी!

बिडवाडी, ता. कणकवली : भक्ती, शक्ती, संस्कार आणि संतविचारांचा अमृतमय संगम अनुभवण्याची संधी बिडवाडी व परिसरातील भाविकांना लाभणार आहे. श्री गुरुदेव दत्त मंदिर, श्री क्षेत्र बिडवाडी येथे बुधवार, दि. १६ डिसेंबर ते रविवार, दि. २० डिसेंबर २०२६ या दत्त जयंती उत्सवाच्या कालावधीत पाच दिवसीय भव्य कीर्तन महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. महाराष्ट्राच्या विविध भागांतून येणाऱ्या नामवंत कीर्तनकारांच्या सुमधुर वाणीने आणि संतचरित्रांच्या प्रभावी निरूपणाने श्री क्षेत्र बिडवाडीची भूमी पाच दिवस भक्तिरसात न्हाऊन निघणार आहे.

या महोत्सवात दररोज एका वेगळ्या संतचरित्राचा आणि आध्यात्मिक विषयाचा जागर करण्यात येणार आहे. दि. १६ डिसेंबर रोजी ह.भ.प. सौ. सायली मुळ्ये (रत्नागिरी) या संत तुकाराम महाराज चरित्रावर कीर्तन सादर करणार आहेत. दि. १७ डिसेंबर रोजी ह.भ.प. श्री. प्रभंजन भगत (शिर्डी) हे शिर्डी साईबाबा चरित्र, दि. १८ डिसेंबर रोजी ह.भ.प. श्री. विलासबुवा गरवारे (सातारा) हे संत दामाजीपंत, दि. १९ डिसेंबर रोजी ह.भ.प. सौ. गौरी खांडेकर (डोंबिवली) या द्रोणागिरी चरित्र, तर दि. २० डिसेंबर रोजी ह.भ.प. श्री. शरदबुवा घाग (नृसिंहवाडी) हे सद्गुरू वासुदेवानंद सरस्वती टेंबेस्वामी महाराज चरित्रावर कीर्तनसेवा सादर करणार आहेत. कीर्तन संध्याकाळी ६.०० वा. सुरू होणार आहे

या पाचही दिवसांच्या कीर्तनसेवेला संगीताची साथ लाभणार असून ऑर्गनची साथ श्री. हर्षद जोशी (देवगड), तर तबल्याची साथ श्री. विनायक जोशी (परुळे) देणार आहेत.

कीर्तन ही महाराष्ट्राची समृद्ध संतपरंपरा जपणारी आणि समाजाला विचारांची दिशा देणारी प्रभावी लोककला आहे. संतांचे जीवनकार्य, त्यांचे विचार, त्याग, भक्ती आणि समाजप्रबोधनाचे कार्य नव्या पिढीपर्यंत पोहोचावे, धार्मिक आणि सांस्कृतिक वारशाचे जतन व्हावे, तसेच सामूहिक भक्तिभावातून समाजमन एकत्र यावे, या व्यापक भावनेतून या कीर्तन महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.

‘कीर्तनरंगी रंगूया, दत्तचरणी लीन होऊया!’ या भक्तिमय भावनेने आयोजित करण्यात आलेल्या या महोत्सवात बिडवाडी तसेच पंचक्रोशीतील भाविक, ग्रामस्थ आणि नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून कीर्तनसेवेचा लाभ घ्यावा, असे आवाहन श्री गुरुदेव दत्त देवस्थान कमिटी, बिडवाडी यांनी केले आहे.

You cannot copy content of this page