लंडनमध्ये वन्यजीव छायाचित्रणातील आंतरराष्ट्रीय पुरस्काराने गौरव; जनजागृती सेवा संस्थेकडून बदलापूर येथे विशेष सत्कार..

⚡बांदा ता.२९-: सिंधुदुर्ग जिल्ह्यातील दोडामार्ग तालुक्याचे सुपुत्र आणि सध्या बदलापूर येथे वास्तव्यास असलेले वन्यजीव छायाचित्रकार सिताराम राऊळ यांनी आपल्या छायाचित्रण कलेच्या माध्यमातून जागतिक स्तरावर कोकणचा नावलौकिक वाढवला आहे. वन्यजीव छायाचित्रण क्षेत्रातील प्रतिष्ठेच्या मानल्या जाणाऱ्या ‘वाईल्डलाइफ फोटोग्राफी’ या आंतरराष्ट्रीय स्पर्धेत त्यांनी ‘इनव्हर्टिब्रेट व्हिजन’ श्रेणीत उल्लेखनीय यश संपादन केले. जगभरातून प्राप्त झालेल्या ६५ हजारहून अधिक छायाचित्रांमधून त्यांच्या छायाचित्राची निवड झाली. या यशाबद्दल लंडन येथे जागतिक स्तरावरील मान्यवरांच्या उपस्थितीत त्यांचा गौरव करण्यात आला.
सिताराम राऊळ यांच्या या आंतरराष्ट्रीय यशाची दखल घेत जनजागृती सेवा संस्थेच्या वतीने त्यांच्या शिरगाव आपटेवाडी, बदलापूर पूर्व येथील निवासस्थानी जाऊन विशेष सत्कार करण्यात आला. संस्थेचे ज्येष्ठ सल्लागार व राष्ट्रपती पदक सन्मानित दिलीप नारकर, उमेद बहुउद्देशीय सामाजिक संस्थेचे अध्यक्ष तथा जनजागृती ग्रुपचे सदस्य सुहास सावंत, सेवानिवृत्त पोलीस अधिकारी दिलीप शिरसाठ आणि संस्थेचे अध्यक्ष गुरुनाथ तिरपणकर यांच्या हस्ते शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ, संस्था अहवाल, निसर्गावर आधारित कविता संग्रह, संस्थेची सरस्वती प्रतिमा व भेटवस्तू देऊन राऊळ यांचा यथोचित गौरव करण्यात आला. यावेळी त्यांचे आई-वडील उपस्थित होते.
यावेळी दिलीप नारकर यांनी राऊळ यांच्या जागतिक स्तरावरील यशाचे विशेष कौतुक करताना, त्यांच्या पुढील कार्यात संस्थेचाही सहभाग असेल, अशी ग्वाही दिली. सुहास सावंत यांनी आंतरराष्ट्रीय स्तरावर कोकण आणि बदलापूरचे नाव उंचावल्याबद्दल त्यांचे अभिनंदन केले. तर दिलीप शिरसाठ यांनी छायाचित्रण क्षेत्रातील त्यांच्या उत्तुंग कामगिरीचे कौतुक करून राऊळ कुटुंबीयांचे अभिनंदन केले.
संस्थेचे अध्यक्ष गुरुनाथ तिरपणकर म्हणाले की, एखाद्या वेगळ्या क्षेत्रात प्रावीण्य मिळवून आपली कला जागतिक स्तरावर पोहोचवणे ही विलक्षण बाब आहे. सिताराम यांच्या या यशामागे त्यांच्या कुटुंबीयांचे, विशेषतः आई-वडिलांचे प्रोत्साहन आणि पाठबळ महत्त्वाचे आहे. त्यांच्या कलाविष्काराचा संस्थेला अभिमान असल्याचेही त्यांनी नमूद केले.
निसर्ग संवर्धनासाठी कार्य करण्याचा मानस
सत्काराला उत्तर देताना सिताराम राऊळ यांनी आपल्या छायाचित्रण कलेचा उपयोग केवळ वैयक्तिक यशापुरता मर्यादित न ठेवता समाज आणि निसर्गाच्या हितासाठी करण्याचा मानस व्यक्त केला. सर्पमित्र म्हणून काम करताना सरपटणाऱ्या प्राण्यांना न मारता त्यांच्या नैसर्गिक अधिवासात सुरक्षित सोडणे, निसर्गाचा समतोल राखणे, कचरा व्यवस्थापन आणि पर्यावरण संवर्धनाबाबत जनजागृती करणे, अशा विविध विषयांवर त्यांनी आपले विचार मांडले. तसेच विविध क्षेत्रांतील कलागुणांना योग्य व्यासपीठ मिळवून देण्यासाठी आणि नवोदितांना प्रोत्साहन देण्यासाठी आपण प्रयत्नशील राहणार असल्याचे त्यांनी सांगितले. दोडामार्गच्या मातीतून घडलेल्या सिताराम राऊळ यांनी वन्यजीव छायाचित्रणाच्या माध्यमातून आंतरराष्ट्रीय स्तरावर मिळवलेले यश ही संपूर्ण कोकणवासीयांसाठी अभिमानास्पद बाब ठरली आहे.
फोटो:-
बदलापूर येथे सीताराम राऊळ यांचा सत्कार करताना जनजागृती सेवा संस्थेचे पदाधिकारी.
