बांदा/प्रतिनिधी
बांदा येथील नट वाचनालयात महात्मा ज्योतिबा फुले यांची पुण्यतिथी विविध उपक्रमांनी साजरी करण्यात आली. यावेळी महात्मा ज्योतिबा फुले आणि क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमांचे पूजन करून पुष्पहार अर्पण करण्यात आले.
महात्मा फुले यांच्या द्विशताब्दी जयंती वर्षाच्या पार्श्वभूमीवर ११ एप्रिल २०२६ ते १० एप्रिल २०२७ हा कालावधी द्विशताब्दी वर्ष म्हणून साजरा करण्यात येत आहे. या अनुषंगाने आयोजित कार्यक्रमात महात्मा फुले यांच्या सामाजिक, शैक्षणिक आणि स्त्रीशिक्षणविषयक कार्याचे स्मरण करण्यात आले.
यावेळी पीएमश्री जिल्हा परिषद प्राथमिक केंद्रशाळा, बांदा नं. १ येथील विद्यार्थ्यांनी महात्मा फुले यांचा प्रसिद्ध विचार, ‘विद्येविना मती गेली, मतीविना नीती गेली, नीतीविना गती गेली, गतीविना वित्त गेले, वित्ताविना शूद्र खचले, इतके अनर्थ एका अविद्येने केले!’ याचे वाचन केले. तसेच विद्यार्थ्यांनी शालेय प्रतिज्ञेचे वाचन केले. महात्मा फुले यांच्या जीवनकार्यावर आधारित ग्रंथप्रदर्शनही यावेळी मांडण्यात आले.
कार्यक्रमात अनंत भाटे आणि वाचनालयाचे अध्यक्ष हेमंत मोर्ये यांनी महात्मा ज्योतिबा फुले यांच्या कार्याची महती सांगत त्यांच्या विचारांचे महत्त्व अधोरेखित केले.
यावेळी वाचनालयाचे सचिव राकेश केसरकर, सहसचिव सुधीर साटेलकर, नागेश सावंत, उपसरपंच रत्नाकर आगलावे, सौ अर्चना सावंत दीपक परब, स्वाती मेस्त्री, ग्रंथपाल सुस्मिता नाईक, शालेय विद्यार्थी, वाचक सभासद तसेच कर्मचारी आदी उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन करून राकेश केसरकर यांनी आभार मानले.
फोटो:-
बांदा नट वाचनालयात महात्मा ज्योतिबा फुले पुण्यतिथी साजरी करण्यात आली.

