मालवण दि प्रतिनिधी
स्वांतत्र्यदिनाच्या औचित्य साधून कोकणातील सुप्रसिद्ध कवी रुजारीओ पिंटो यांच्या ‘माँ मेरी’ या पहिल्यावहिल्या हिंदी कवितासंग्रहाचा प्रकाशन सोहळा येत्या १५ ऑगस्ट रोजी सायंकाळी ४.३० वाजता मालवण-कोळंब येथील समर्थ मंगल कार्यालयात सायंकाळी ४.३० वाजता पार पडणार असून, तमाम काव्यप्रेमी आणि साहित्यिकांनी या सोहळ्याला बहुसंख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन नितीन वाळके यांनी पत्रकार परिषदेत केले. या पत्रकार परिषदेला कवी रुजारीओ पिंटो यांच्यासह आगोस्तीन डिसोझा उपस्थित होते.
या हिंदी काव्यसंग्रहाचे प्रकाशन कवी पिंटो यांचे भंडारी हायस्कूलमधील माजी हिंदी शिक्षक रवींद्र वराडकर यांच्या हस्ते होणार आहे. राष्ट्रभाषा पंडित कृष्णा मालंडकर यांनी या पुस्तकाची प्रस्तावना लिहिली असून ते सोहळ्याला विशेष उपस्थित असणार आहेत. कोकण मराठी साहित्य परिषद व साने गुरुजी कथामालेचे ज्येष्ठ कार्यकर्ते सुरेश ठाकूर गुरुजी यांची प्रमुख उपस्थिती लाभणार आहे. रत्नागिरीतील ‘सत्वश्री प्रकाशन’चे (कोकण मीडिया कन्सल्टन्सी) प्रमोद कोनकर यांनी हे पुस्तक प्रकाशित केले असून, आकर्षक मुखपृष्ठ प्रवीण पवार यांनी साकारले आहे.
कवी रुजारीओ पिंटो
यावेळी बोलताना कवी रुजारीओ पिंटो म्हणाले, “मराठी, मालवणी आणि कोंकणी भाषेत मी आजवर लिहिलेल्या कविता व कथांना रसिकांनी भरभरून प्रतिसाद दिला. आपली मालवणी संस्कृती आणि लोकजीवन केवळ इथपर्यंतच मर्यादित न राहता राष्ट्रभाषेच्या माध्यमातून देशभरातील रसिकांपर्यंत पोहोचावे, या उद्देशाने मी हा हिंदी कवितासंग्रह रचला आहे.”
या कवितासंग्रहात ८६ निवडक व दर्जेदार कवितांचा समावेश आहे. ‘माँ मेरी’ हे नाव एका बाजूला आईची माया व्यक्त करते, तर दुसऱ्या बाजूला माझ्या आईचे नाव ‘मेरी’ असल्याने या शीर्षकाला विशेष भावनिक महत्त्व लाभले आहे.
मालवणवासीय, साहित्यप्रेमी आणि हिंदी भाषाप्रेमींनी १५ ऑगस्ट रोजी सायंकाळी ४.३० वाजता समर्थ मंगल कार्यालय, कोळंब येथे उपस्थित राहून या कार्यक्रमाची शोभा वाढवावी, असे आवाहन आयोजकांतर्फे करण्यात आले आहे
