प्रारूप मतदार यादी २४ ऑगस्ट रोजी प्रसिद्ध होणार
सिंधुदुर्गनगरी, दि.१३ : भारतीय निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार जिल्ह्यात सुरू असलेल्या विशेष सखोल पुनरिक्षण (SIR-२०२६) मोहिमेत सिंधुदुर्ग जिल्हा निवडणूक प्रशासनाने उल्लेखनीय कामगिरी केली आहे. जिल्ह्यासाठी प्राप्त झालेल्या विहित डेटाचे डिजिटायझेशन आणि अनकलेक्टेड फॉर्म्सची कार्यवाही पूर्ण करून १०० टक्के काम पूर्ण करण्यात आले आहे.
भारत निवडणूक आयोगाच्या आकडेवारीनुसार सिंधुदुर्ग जिल्ह्यातील एकूण ६,८८,०१४ मतदारांचे सर्वेक्षण करण्यात आले. यामध्ये २६८-कणकवली विधानसभा मतदारसंघातील २,३४,२५१, २६९-कुडाळमधील २,१९,२४४ आणि २७०-सावंतवाडीमधील २,३४,५१९ मतदारांच्या सर्वेक्षणाचे काम पूर्ण झाले आहे. जिल्ह्यातील एकूण ६,०५,४०९ फॉर्म्सचे यशस्वी डिजिटायझेशन करण्यात आले असून, हे प्रमाण ८७.९९ टक्के आहे. उर्वरित फॉर्म्समध्ये अनकलेक्टेड फॉर्म्स, दुबार, मृत किंवा स्थलांतरित प्रवर्गाचा समावेश असून, डिजिटायझेशन व अनकलेक्टेड फॉर्म्सची कार्यवाही पूर्ण करून एकूण १०० टक्के काम पूर्ण करण्यात आले आहे.
ज्या मतदारांचे गणना प्रपत्र त्यांच्या स्वाक्षरीसह प्राप्त झालेले नाही, त्यांचा समावेश ‘अनकलेक्टेबल ईएफ’ या संज्ञेखाली गैरहजर, स्थलांतरित, मृत आणि दुबार या गटांमध्ये करण्यात आला असून त्यांचेही डिजिटायझेशन करण्यात आले आहे. या गटातील कोणताही पात्र मतदार मतदार यादीत समाविष्ट होण्यापासून वंचित राहू नये, यासाठी योग्य त्या पद्धतीने पडताळणी करण्यात येत आहे. ‘अंकलेक्टेबल ईएफ’ या संवर्गातील एएसडीडी गटातील मतदारांच्या मतदान केंद्रनिहाय याद्या sindhudurg.nic.in या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.
गणना प्रपत्र भरून घेण्याची कार्यवाही १७ ऑगस्ट २०२६ पर्यंत पूर्ण करण्यात येणार असून, त्याआधारे २४ ऑगस्ट २०२६ रोजी प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध करण्यात येणार आहे. प्रारूप मतदार यादीत नाव समाविष्ट नसल्यास भारत निवडणूक आयोगाच्या सुधारित कार्यक्रमानुसार २४ ऑगस्ट ते २३ सप्टेंबर २०२६ या कालावधीत दावे व हरकती दाखल करता येतील. सुनावणी घेऊन दावे व हरकती निकाली काढण्याची अंतिम तारीख २२ ऑक्टोबर २०२६ असून, त्यानंतर २७ ऑक्टोबर २०२६ रोजी अंतिम मतदार यादी प्रसिद्ध करण्यात येणार आहे.
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मतदार यादी १०० टक्के अचूक आणि पारदर्शक बनवणे हे आमचे उद्दिष्ट आहे. योग्य मतदार वगळला जाणार नाही तसेच अयोग्य मतदार मतदार यादीत समाविष्ट होणार नाही, यासाठी सर्व नागरिकांनी मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (BLO) यांच्याकडील यादी तपासून लोकशाहीच्या या महत्त्वाच्या प्रक्रियेत आपला सहभाग नोंदवावा, असे आवाहन जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांनी केले आहे.
००००००
