विद्यार्थी आणि पालक यांनी तयार केले विविध खाद्यपदार्थ
कुडाळ : खाद्यपदार्थ विक्रीवर शालेय परिसरात विविध निर्बंध आल्यामुळे मुलांना आरोग्यासाठी चांगले खाद्य कोणते हे समजावे म्हणून इको क्लब आणि हरित सेना स्कूलच्या वतीने खाद्य उत्सव घेण्यात आला. यामध्ये मुलांनी आणि पालकांनी बऱ्याच वस्तूंची निर्मिती केली आणि विक्री ही केली. एका तासामध्ये तब्बल पंधरा हजारापर्यंत खाद्यपदार्थांच्या वस्तूंची विक्री झाली. यामध्ये अळूवडी, नाचणीचे ढोकळे, तांदळाचे प्रकार, भाज्याचे पराठे, भाज्यांचे प्रकार, इडली सांबार, मोड आलेली मूग मटकी पासून तयार केलेली भेळ आणि भज्यांचा समावेश होता. त्याचप्रमाणे विविध वन औषधी पासून बनविलेले पदार्थ होते .
आरोग्यदायी खाद्य कोणते हे मुलांना समजावे हा मुख्य उद्देश या उपक्रमाचा होता. पाट हायस्कूल हरित सेना आणि इको क्लब मार्फत वर्षभरात विविध उपक्रम राबविले जातात. यावर्षी सीड बॉलचाही प्रमुख उपक्रम घेण्यात आला. यामध्ये जवळजवळ एक हजार सीडबॉल बनवले होते. त्यांचेही वाटप करण्यात आले. मुलांना निसर्गाची आवड लागली पाहिजे. जे निसर्ग आपणाला देतो त्याचा स्वीकार कसा करावा हे मुलांना कळावे याकरिता असे उपक्रम वारंवार राबविले जातात.
मुख्याध्यापक सयाजी बोंदर, पर्यवेक्षिका अंकिता मोडक, उपक्रम प्रमुख संदीप साळसकर, जि प सदस्या यज्ञा गोसावी मॅडम, सिद्धी चव्हाण त्याचप्रमाणे सर्व शिक्षकानी या मुलांना मार्गदर्शन केले आणि उपक्रम यशस्वी केला. एस के पाटील शिक्षण प्रसारक मंडळ पाट संस्था पदाधिकारी आणि पालक वर्गातूनही या उपक्रमाचे कौतुक करण्यात आले. मुलांनीही आनंददायी शनिवार या उपक्रमातून लाभ घेतला. बांधावरची शाळा हा उपक्रमही शेतात जाऊन राबवीला. सांगळे सर आणि यज्ञा साळगावकर यांनी शेतीचाही अनुभव दिला. एक पेड माँ के नाम या शासकीय उपक्रमाची माहिती दिली आणि जास्तीत जास्त वृक्ष लागवड करण्याबाबत कल्पना दिली.
