तुळस येथे ३ जानेवारीला खुली दौड स्पर्धा..

⚡वेंगुर्ला ता.२९-: पाण्याचे महत्त्व, जलसंवर्धनाची गरज आणि भविष्यातील पाणीटंचाईचे गांभीर्य समाजापर्यंत पोहोचविण्याच्या उद्देशाने वेताळ प्रतिष्ठानतर्फे ‘पाण्यासाठी धावूया, भविष्य सुरक्षित करूया!’ या संदेशासह खुल्या दौड स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. ‘अश्वमेध तुळस महोत्सव २०२७’ अंतर्गत ३ जानेवारी २०२७ रोजी सकाळी ६.३० वाजता तुळस येथील श्री वेताळ मंदिर येथे ही स्पर्धा होणार आहे.
पाणी हे जीवनाचे मूलभूत साधन असून वाढती पाणीटंचाई, अनियमित पाऊस आणि भूजल पातळीतील घट या बाबी चिंतेचा विषय बनल्या आहेत. पाण्याचा प्रत्येक थेंब महत्त्वाचा असून जलसंधारण, पाणी अडविणे, पाणी जिरविणे आणि पाण्याचा काटकसरीने वापर करणे ही काळाची गरज आहे. केवळ पावसाळ्यात पाणी उपलब्ध होणे पुरेसे नसून त्याचे योग्य नियोजन आणि संवर्धन करणे आवश्यक आहे. याच जाणिवेतून दौड स्पर्धेच्या माध्यमातून जलसंवर्धनाचा संदेश देण्याचा प्रतिष्ठानचा प्रयत्न आहे.
ही स्पर्धा एकूण १२ गटांमध्ये होणार आहे. शालेय विद्यार्थ्यांसाठी मुलांचे आणि मुलींचे स्वतंत्र पाच गट असतील. यामध्ये इयत्ता पहिली ते दुसरी, तिसरी ते चौथी, पाचवी ते सहावी, सातवी ते आठवी आणि नववी ते दहावी अशा गटांचा समावेश आहे. प्रत्येक शालेय गटात मुलगे व मुलींची स्वतंत्र स्पर्धा होणार आहे. याशिवाय खुला पुरुष आणि खुला महिला असे दोन गट असतील.
खुल्या पुरुष गटातील विजेत्यांना अनुक्रमे १,५७५, १,०७५ आणि ७७५ रुपये, तर खुल्या महिला गटातील विजेत्यांना अनुक्रमे १,०००, ७०० आणि ५०० रुपये रोख पारितोषिके देण्यात येणार आहेत. शालेय गटातील विजेत्यांना रोख पारितोषिक आणि सन्मानचिन्ह देण्यात येईल. स्पर्धेत सहभागी होणाऱ्या प्रत्येक धावपटूला सहभाग प्रमाणपत्र देऊन प्रोत्साहित करण्यात येणार आहे.
शालेय गटातील स्पर्धकांनी स्पर्धेच्यावेळी शाळेचे ओळखपत्र अथवा शाळेचे शिफारसपत्र सादर करणे आवश्यक आहे. नावनोंदणी महेश राऊळ (९४०५९३३९१२) किंवा प्रदीप परुळकर (९५५२४३६४७७) यांच्याकडे करावी.
जास्तीत जास्त धावपटूंनी या स्पर्धेत सहभागी होऊन जलसंवर्धनाच्या सामाजिक चळवळीत योगदान द्यावे, असे आवाहन वेताळ प्रतिष्ठानचे अध्यक्ष डॉ. सचिन परुळकर यांनी केले आहे.
