विष्णू देवेकर यांच्याकडून स्कूल बससाठी १० हजार १०१ रुपयांची देणगी:चेंदवणच्या माजी शिक्षक, विद्यार्थी आणि हितचिंतकांना आर्थिक सहकार्याचे आवाहन..

⚡कुडाळ ता.२९-: श्री देवी माऊली माध्यमिक विद्यालय, चेंदवणचे माजी शिक्षक विष्णू दत्तात्रय देवेकर यांनी विद्यालयाच्या स्कूल बस खरेदी उपक्रमासाठी १० हजार १०१ रुपयांची देणगी दिली. शाळेशी असलेले ऋणानुबंध आणि जिव्हाळा जपत त्यांनी सामाजिक बांधिलकीचे उदाहरण घालून दिले आहे.
२६ नोव्हेंबर २०२६ रोजी विद्यालयाला सदिच्छा भेट दिल्यानंतर त्यांनी शाळेच्या स्कूल बस उपक्रमाची माहिती घेतली. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना सुरक्षित आणि नियमित वाहतूक सुविधा उपलब्ध व्हावी, या उद्देशाने शाळेने स्कूल बस खरेदीचा संकल्प केला आहे. या उपक्रमाला हातभार लावत देवेकर यांनी तत्काळ १० हजार १०१ रुपयांची आर्थिक मदत सुपूर्द केली.
ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना दूरच्या वाड्या-वस्त्यांमधून शाळेत ये-जा करताना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. स्कूल बस उपलब्ध झाल्यास विद्यार्थ्यांचा प्रवास अधिक सुरक्षित आणि सोयीस्कर होण्यास मदत होणार आहे. यापूर्वीही संस्थेच्या माजी मुख्याध्यापक आणि शिक्षकांनी या उपक्रमासाठी आर्थिक सहकार्य केले आहे.
या उपक्रमासाठी चेंदवण शिक्षणोत्तेजक मंडळ, मुंबईचे पदाधिकारी, माजी शिक्षक, माजी विद्यार्थी, पालक, ग्रामस्थ आणि हितचिंतकांनी आर्थिक सहकार्य करावे, असे आवाहन संस्थेच्या वतीने करण्यात आले आहे. देवेकर यांच्या योगदानाबद्दल संस्थेचे पदाधिकारी, मुख्याध्यापक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि पालकांनी त्यांचे आभार मानले.
