Headlines

एसटी महामंडळाच्या स्मार्ट कार्ड केंद्राचा भोंगळ कारभार..

कुडाळ बस स्थानकात ज्येष्ठ नागरिकांची परवड:ठाकरेंच्या शिवसेनेने अधिकाऱ्याला घातला घेराव..

⚡कुडाळ ता.१३-: १ सप्टेंबर पासून स्मार्ट कार्ड नसेल तर सवलतीच्या दरात प्रवास करता येणार नाही असं परिवहनमंत्र्यांनी जाहीर केलेले असताना कुडाळ बस स्थानकात असलेले कार्ड वितरण केंद्र दोन दोन दिवस बंद ठेवून प्रवाशांना वेठीस धरण्याचा प्रकार सध्या सुरु आहे. त्यामुले या स्मार्ट कार्डचे प्रमुख लाभार्थी असणारे ज्येष्ठ नागरिक, महिला यांच्यात रोष वाढला आहे. या गोष्टीची युवा सेना जिल्हाप्रमुख तथा शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नगरसेवक मंदार शिरसाट यांनी दखल घेत स्मार्ट कार्ड वितरण केंद्राला आपल्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांसह भेट दिली. प्रवाशांना वेठीस धरण्याच्या या प्रकारचा मंदार शिरसाट यांनी निषेध करत कार्ड वितरण व्यवस्थेत सुधारणा झाली नाही तर एसटीच्या अधिकाऱ्यांना घेराओ घालण्याचा इशारा दिला आहे.
सध्या शेतीची कामे जोरात सुरू असतानाही नागरिक व ज्येष्ठ नागरिक स्मार्ट कार्ड काढण्यासाठी वेळ काढून बस स्थानकाकडे येत आहेत. तालुक्याच्या ठिकाणी प्रवासासाठी एसटी महामंडळ हाच एकमेव मुख्य पर्याय असल्याने दररोज मोठी गर्दी होत आहे. मात्र, तासनतास ताटकळत राहिल्यानंतरही स्मार्ट कार्डच्या कार्यालयाला कुलूप पाहायला मिळत आहे. लांबच्या गावांमधून प्रवास करून येणाऱ्या वृद्धांचा वेळ, पैसा आणि श्रम वाया जात असून, प्रवाशांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे.
स्मार्ट कार्ड योजनेत सुरुवातीपासूनच गोंधळ आणि ताळमेळाचा अभाव दिसून आला आहे. या कामाचे कंत्राट खाजगी कंपनीला दिलेले असल्याने ‘आमचा यात काही संबंध नाही’ असे सांगून एसटी कर्मचारी व प्रशासन आपली जबाबदारी झटकत आहेत. त्यामुळे या कंत्राटदारावर व कर्मचाऱ्यांवर महामंडळाचा अथवा प्रशासनाचा कोणताही अंकुश उरलेला नाही, असा आरोप नागरिकांनी केला आहे.
स्मार्ट कार्ड वितरण कार्यालयाला कुलूप असल्याचे पाहून गुरुवारी नगरसेवक मंदार शिरसाट यांनी कुडाळ बस स्थानकावर जाऊन एसटी प्रशासकीय अधिकाऱ्यांशी संपर्क साधला. त्यांनी या कारभाराबद्दल तीव्र खंत व तक्रार व्यक्त केली. दूरवरून उपाशीपोटी येणाऱ्या या ज्येष्ठ नागरिकांच्या जेवणाची अन् राहण्याची सोय हे प्रशासन करणार आहे का? अशा बेजबाबदार माणसांना कंत्राट दिलेच का? असा थेट व संतप्त सवाल उपस्थित करत शिवसेना पदाधिकारी व जमलेल्या वृद्धांनी अधिकाऱ्यांना जाब विचारला. परिस्थिती इतकी बिकट झाली होती की नागरिक बस स्थानक परिसरातील स्मार्ट कार्ड कार्यालयाला कुलूप ठोकण्याच्या तयारीत होते.
यावेळी शिवसेनेचे राजन नाईक व इतर कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. एसटीच्या संबंधित अधिकाऱ्यांनी या सर्व प्रकरणाची तात्काळ चौकशी करून कंत्राटदारावर योग्य ती कारवाई करण्याचे आश्वासन दिले. मात्र, एसटी व्यवस्थापनाने हा विषय लवकरात लवकर न सोडवल्यास आगामी काळात तीव्र व कठोर आंदोलन छेडण्याचा इशारा नगरसेवक मंदार शिरसाट यांनी दिला आहे.

You cannot copy content of this page