बांदा ता.१३-:
गोवा स्वातंत्र्य संग्रामात सिंधुदुर्गातील विशेषतः बांदा परिसरातील स्वातंत्र्यसैनिकांचे योगदान अत्यंत मोलाचे राहिले आहे. पत्रादेवी सीमाभाग हा गोवा मुक्ती लढ्याचा महत्त्वाचा साक्षीदार ठरला असून या लढ्यातील हुतात्म्यांच्या स्मृती जतन करण्यासाठी उभारण्यात आलेल्या पत्रादेवी येथील हुतात्मा स्मारकाचे उद्घाटन येत्या २५ ऑगस्ट रोजी देशाचे संरक्षणमंत्री राजनाथ सिंग यांच्याहस्ते करण्यात येणार असल्याची माहिती गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी दिली.
या उद्घाटन सोहळ्यास भारताचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंग प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार असल्याचेही त्यांनी सांगितले. त्यामुळे सीमाभागातील स्वातंत्र्यसैनिकांच्या कार्याला राष्ट्रीय स्तरावर मानवंदना मिळणार आहे. गोवा स्वातंत्र्य संग्रामाच्या इतिहासात बांदावासीयांनी केलेल्या त्याग आणि संघर्षाचे विशेष स्थान आहे. अनेक स्वातंत्र्यसैनिकांनी पत्रादेवी-बांदा सीमाभागातून आंदोलन, सत्याग्रह आणि विविध चळवळींमध्ये सक्रिय सहभाग घेतला होता. त्यामुळे या स्मारकाचे उद्घाटन हे बांदा परिसरासाठीही ऐतिहासिक महत्त्वाचे ठरणार आहे.
दरम्यान, ‘वंदे मातरम्’च्या इतिहासावर आधारित विशेष प्रदर्शन गोव्यातील आझाद मैदानावर मांडण्यात आले आहे. या प्रदर्शनात स्वातंत्र्य चळवळीतील विविध टप्पे, ऐतिहासिक दस्तऐवज आणि दुर्मीळ छायाचित्रांचा समावेश करण्यात आला आहे. राज्यातील नागरिकांसह सीमाभागातील नागरिकांनीही या प्रदर्शनाला आवर्जून भेट द्यावी, असे आवाहन मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी केले.
पत्रादेवी हुतात्मा स्मारकाच्या उद्घाटनानिमित्त गोवा मुक्ती संग्रामातील बांदावासीयांच्या योगदानाचा पुन्हा एकदा गौरव होणार असल्याने सीमाभागात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.
पत्रादेवी हुतात्मा स्मारकाचे २५ ऑगस्टला उद्घाटन…
