Headlines

वामनराव महाडिक विद्यालयाच्या शिरपेचात मानाचा तुरा

प्रा. अन्वी गवाणकर यांचा जिल्हास्तरीय निबंध स्पर्धेत तृतीय क्रमांक

कणकवली :
तळेरे येथील वामनराव महाडिक माध्यमिक विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयाच्या मराठी व इतिहास विषयाच्या शिक्षिका प्रा. अन्वी गवाणकर यांनी हुतात्मा मेजर कौस्तुभ राणे यांच्या स्मृतिदिनानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या जिल्हास्तरीय निबंध स्पर्धेत तृतीय क्रमांक पटकावला आहे. त्यांच्या या यशामुळे प्रशालेच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे.
अध्यापन क्षेत्रात आपल्या उत्कृष्ट कार्याचा ठसा उमटविण्यासोबतच प्रा. गवाणकर या विविध शैक्षणिक, साहित्यिक आणि सांस्कृतिक उपक्रमांमध्ये उत्स्फूर्तपणे सहभागी होणाऱ्या हरहुन्नरी शिक्षिका म्हणून परिचित आहेत. मराठी भाषा, साहित्य आणि इतिहास या विषयांची त्यांना विशेष आवड असून विद्यार्थ्यांमध्ये वाचन, लेखन, साहित्यिक जाणिवा आणि सर्जनशीलता रुजवण्यासाठी त्या सातत्याने प्रयत्नशील असतात. यापूर्वीही त्यांनी राज्यस्तरीय वक्तृत्व व निबंध लेखन स्पर्धांमध्ये उल्लेखनीय यश मिळवले आहे.
त्यांच्या या यशाबद्दल संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीकृष्ण खटावकर, शाळा समितीचे चेअरमन अरविंद महाडिक, सर्व शाळा समिती सदस्य, प्राचार्य अविनाश मांजरेकर, शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी व पालकांनी त्यांचे अभिनंदन करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.

You cannot copy content of this page