Headlines

मोती तलावातील पाणी दूषित..

तातडीने उपाययोजना करा: माजी नगरसेवक सुरेश भोगटे यांची मागणी..

⚡सावंतवाडी ता.१३-: शहराची ओळख असलेल्या मोती तलावातील पाणी सांडपाणी व गटाराच्या पाण्यामुळे दूषित होत असल्याने त्याची तातडीने स्वच्छता करून योग्य ती उपाययोजना करावी, अशी मागणी सावंतवाडी माजी नगरसेवक सुरेश भोगटे यांनी केली आहे.याबाबत माजी नगरसेवक सुरेश भोगटे यांच्यासह नागरिकांनी सावंतवाडी नगरपरिषदेच्या मुख्याधिकाऱ्यांना निवेदन दिले आहे.

निवेदनात म्हटले आहे की, सावंतवाडी मोती तलाव हा शहराची सुंदर ओळख असून, सध्या तलावाकडे दुर्लक्ष झाल्याचे दिसून येत आहे. शहरातील काही भागांमधील घरांचे सांडपाणी तलावात सोडले जात आहे. तसेच तलावाभोवती असलेल्या काही इमारतींचे ड्रेनेजचे पाणीही तलावात जाण्याचा मार्ग आहे. त्यामुळे तलावातील पाणी दूषित होत असून, त्याचा शहराच्या सौंदर्यावर तसेच पर्यावरणावर परिणाम होत आहे.
गणपती विसर्जनासाठी याच तलावाचा मोठ्या प्रमाणावर वापर केला जातो. हिंदू धर्मातील हा मोठा सण नागरिक मोठ्या श्रद्धेने साजरा करतात. मात्र, तलावातील पाणी दूषित असल्याने विसर्जनानंतर तलावाच्या स्थितीवर आणखी परिणाम होण्याची शक्यता आहे. त्यामुळे गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर तलावातील पाणी स्वच्छ व विनादूषित ठेवण्यासाठी तातडीने योग्य ती कार्यवाही करावी, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे.
तलावात सांडपाणी सोडले जाणारे मार्ग तातडीने बंद करावेत, तलाव परिसराची स्वच्छता करावी तसेच मोती तलावाचे सौंदर्य आणि पर्यावरण अबाधित ठेवण्यासाठी कायमस्वरूपी उपाययोजना कराव्यात, अशी मागणी करण्यात आली आहे. यावेळी शहर हितवर्धक मंचाच्या पदाधिकाऱ्यांनी नगरपरिषदेने या गंभीर प्रश्नाकडे तातडीने लक्ष द्यावे, असे आवाहन केले.

You cannot copy content of this page