२१ टेंडर प्रकरणात घेतलेली हरकत नियमानुसारच:जिल्हाधिकाऱ्यांकडील सुनावणीच्या निकालाकडे सर्वांचे लक्ष..
⚡कणकवली ता.१३-:
कणकवली नगरपंचायतीच्या मुख्याधिकारी गौरी पाटील यांच्याविरोधात जिल्हाधिकाऱ्यांकडे करण्यात आलेल्या तक्रारींच्या पार्श्वभूमीवर, माजी नगराध्यक्ष समीर नलावडे यांनी त्यांच्या कामकाजाचे ठाम समर्थन केले आहे. गेल्या आठ ते नऊ महिन्यांच्या कालावधीत गौरी पाटील यांनी नगरपंचायतीचा कारभार अत्यंत सक्षमपणे सांभाळला असून, त्यांच्या प्रशासकीय कामकाजात कोणतीही गंभीर चूक झालेली नाही, असे नलावडे यांनी माध्यमांशी बोलताना स्पष्ट केले.
नगरपंचायतीच्या इतिहासात मुख्याधिकाऱ्यांविरोधात तक्रार होण्याची ही पहिलीच वेळ असल्याचे सांगत नलावडे म्हणाले, कणकवली नगरपंचायत स्थापन झाल्यापासून मी येथील कारभार जवळून पाहत आहे. या तक्रारींमधून काहीही निष्पन्न होणार नसून, मुख्याधिकाऱ्यांना पूर्णपणे क्लीन चिट मिळेल. गौरी पाटील यांनी कणकवलीसोबतच देवगड नगरपालिकेचा अतिरिक्त कारभारही चांगल्या प्रकारे हाकलला असून, तेथील नगरसेवकांकडूनही त्यांच्या कामाबाबत सकारात्मक प्रतिक्रिया मिळाल्याचे त्यांनी सांगितले.
वादाच्या भोवऱ्यात सापडलेल्या २१ टेंडरच्या प्रक्रियेबाबत बोलताना समीर नलावडे यांनी सांगितले की, या प्रक्रियेतील इतिवृत्त अंतिम करताना मुख्याधिकाऱ्यांनी नियमाला धरूनच हरकत घेतली आहे. नगरपंचायतीच्या प्रशासकीय प्रमुख या नात्याने नियमांच्या चौकटीत राहून निर्णय घेण्याचा त्यांना पूर्ण अधिकार आहे. मुख्याधिकाऱ्यांनी महाराष्ट्र नगरपालिका अधिनियमातील ‘कलम ३०८’ अंतर्गत जिल्हाधिकाऱ्यांकडे दाद मागितली असून, ही त्यांची नियमित प्रशासकीय प्रक्रिया आहे.
दरम्यान, २१ टेंडर प्रकरणाबाबत जिल्हाधिकाऱ्यांकडे सुनावणी सुरू असून अंतिम निकाल अद्याप प्रलंबित आहे. मुख्याधिकाऱ्यांची भूमिका नियमानुसारच असल्याचे माजी नगराध्यक्षांनी स्पष्ट केल्यामुळे आता जिल्हाधिकाऱ्यांच्या सुनावणीत काय निर्णय होतो, याकडे राजकीय व प्रशासकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.
