Headlines

डामरे येथे ब्रेझा मातीच्या ढिगाऱ्यावर आदळली; फोंडाघाटच्या तरुणाचा मृत्यू

कणकवली : कणकवली-फोंडाघाट मार्गावर डामरे (करूळ) येथील कानडेवाडी स्टॉपजवळ ब्रेझा गाडी मातीच्या ढिगाऱ्यावर आदळून झालेल्या अपघातात मैत्रेय उर्फ गोट्या राजेश पेडणेकर (वय २८, रा. फोंडाघाट बाजारपेठ, ता. कणकवली) यांचा मृत्यू झाला. हा अपघात बुधवार, दि. १२ ऑगस्ट रोजी रात्री ९.४५ वाजण्यापूर्वी घडला.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मैत्रेय पेडणेकर हे एमएच-०७-एजी-१६८६ क्रमांकाच्या ब्रेझा गाडीने कणकवलीहून फोंडाघाटकडे जात होते. डामरे (करूळ) येथील कानडेवाडी स्टॉपजवळ आल्यानंतर रस्त्याच्या विशिष्ट परिस्थितीकडे दुर्लक्ष करून गाडी भरधाव वेगाने चालविल्याने ती फोंड्याच्या दिशेने जाणाऱ्या रस्त्याच्या विरुद्ध दिशेला गेली. त्यानंतर रस्त्याच्या बाजूला असलेल्या मातीच्या ढिगाऱ्यावर गाडी आदळून अपघात झाला. या अपघातात मैत्रेय पेडणेकर यांचा मृत्यू झाला.

या प्रकरणी विजय गोविंद हळदिवे (वय ५३, रा. फोंडाघाट बाजारपेठ, ता. कणकवली) यांनी कणकवली पोलीस ठाण्यात खबर दिली.घटनेची माहिती मिळताच कणकवली पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक कमलेश बच्छाव, पोलीस उपनिरीक्षक प्रितेश पाटील, विनोद चव्हाण, श्री. ठोंबरे, मकरंद माने आणि अवी पाटील घटनास्थळी दाखल झाले. या घटनेचा तपास पोलीस उपनिरीक्षक प्रितेश पाटील करीत आहेत.

You cannot copy content of this page